स्टॅन वाव्रींका उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 March 2017

इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया) - तीन वेळचा ग्रॅंड स्लॅम विजेता स्टॅन वाव्रींकाने तीन सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत आठव्या मानांकित डॉमिनिक थिएम याचे आव्हान संपुष्टात आणत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याची गाठ आता स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाशी पडणार आहे.

इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया) - तीन वेळचा ग्रॅंड स्लॅम विजेता स्टॅन वाव्रींकाने तीन सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत आठव्या मानांकित डॉमिनिक थिएम याचे आव्हान संपुष्टात आणत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याची गाठ आता स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाशी पडणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वाव्रींकाने अडीच तासांच्या लढतीनंतर ऑस्ट्रियाच्या थिएमचे आव्हान 6-4, 4-6, 7-6(7-2) असे संपुष्टात आणले. अन्य एका लढतीत पाब्लो बुस्टा याने उरुग्वेच्या पाब्लो क्‍युवास याचा 6-1, 3-6, 7-6(7-4) असा पराभव केला.

स्वित्झर्लंडच्या 31वर्षीय वाव्रींकाचा हा एटीपी मालिकेतील 450वा विजय ठरला. या विजयाने कारकिर्दीतील दुसऱ्या मास्टर्स विजेतेपदाचे आपले आव्हान त्याने कायम राखले. यापूर्वी त्याने 2-14 मध्ये मॉंटो कार्लो स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

पहिल्या सेटमध्ये वाव्रींकाने पहिलीच गेम गमावली होती. या धक्कादायक सुरवातीनंतर मात्र त्याने दोन वेळा थिएमची सर्व्हिस ब्रेक करून पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये थिएमने तिसऱ्याच गेमला ब्रेकची संधी साधून मिळविलेली आघाडी टिकवत दुसरा सेट जिंकला.

निर्णायक सेटमध्ये पहिल्याच गेमला दोन ब्रेक पॉइंट वाचवून वाव्रींकाने थिएमची सर्व्हिस ब्रेक करत सुरवातीलाच 3-0 अशी आघाडी मिळविली. जिगरबाज थिएमने नंतर सलग तीन गेम जिंकत 3-3 अशी बरोबरी साधत चुरस कायम राखली. नवव्या गेमला थिएमला ब्रेक पॉइंटची संधी साधता आली नाही. नंतर 12व्या गेमला आपल्या सर्व्हिसवर त्याला मॅच पॉइंट वाचवण्यासाठी शिकस्त करावी लागली. त्यामुळे सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये मात्र वाव्रींकाने त्याला संधी दिली नाही.

थिएम तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. दोघांकडून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन झाले. तिसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये माझी सर्व्हिस चांगली झाली. हाच निर्णायक क्षण ठरला.
- स्टॅन वाव्रींका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian wells tennis competition