चौथ्या फेरीतच फेडररशी गाठ शक्य
कॅलिफोर्निया - स्पेनच्या रॅफेल नदाल आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांनी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. नदालने अर्जेंटिनाच्या गुईडो पेला याचा 6-3, 6-2; तर कारकिर्दीत 18 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदांची अनोखी कामगिरी करणाऱ्या फेडररने अवघ्या 51 मिनिटांत स्टिफन रॉबर्ट याचे आव्हान 6-2, 6-1 असे मोडून काढले.
फेडररची गाठ आता अमेरिकेच्या स्टिव्ह जॉन्सन याच्याशी पडेल. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा 6-4, 3-6, 7-6(7-4) असा पराभव केला. नदालची गाठ फर्नांडो व्हेर्डास्कोशी पडेल. त्याने हर्बर्ट पिएरे हुग्युएसचा 7-6, 6-1 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीतही नदाल आणि फेडरर यांची आगेकूच कायम राहिल्यास चौथ्याच फेरीत नदाल आणि फेडरर समोरासमोर येतील. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत फेडररने नदालवरच मात करून कारकिर्दीतले 18वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले होते.
दुसऱ्या फेरीत्या अन्य एका लढतीत चौथ्या मानांकित केई निशिकोरी याने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 6-4 असा पराभव करून आगेकूच कायम राखली.
अन्य निकाल ः नोव्हाक जोकोविच वि.वि. काईल एडमंड 6-4, 7-6(7-5), ज्युआन मार्टिल डेल पोट्रो वि.वि. फेड्रीको डेल बोनिस 7-6(7-5), 6-3
मरेचा पराभव
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरे याला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. पात्रता फेरीतून आलेल्या कॅनडाच्या वासेक पॉस्पिसिल याने त्याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. मरेच्या सेकंड सर्व्हिसवर संधी मिळेल, तेव्हा नेटवर येऊन खेळण्याचे पॉस्पिसिलचे नियोजन अचूक ठरले. त्याने मरेवर वर्चस्व राखत 6-4, 7-6(7-5) असा विजय मिळविला.
|