
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सायंकाळी ‘लॉकर रूम’मध्ये चर्चा करताना संघ म्हणून आम्हाला खराब कामगिरीची किती लाज वाटत होती हे मला जाणवले. कर्णधार म्हणून मला या संघाचा अपार अभिमान वाटतो. प्रज्ञेशने देशासाठी विजय खेचून आणला.
- महेश भूपती, नॉन प्लेइंग कॅप्टन
तियानजीन (चीन) - भारताने डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी जागतिक गट पात्रता लढतीमधील स्थान निश्चित केले. लिअँडर पेसने दुहेरीत सर्वाधिक विजयांचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी ‘रिव्हर्स सिंगल्स’मध्ये बाजी मारत चीनवरील सनसनाटी विजय साकारला.
आशिया-ओशेनिया विभागातील गट क्रमांक एकच्या या लढतीत पहिल्या दिवशी रामकुमार आणि सुमीत नागल यांचा ‘ओपनिंग सिंगल्स’मध्ये पराभव झाल्यामुळे भारत ०-२ असा पिछाडीवर पडला होता. नव्या स्वरूपानुसार दुहेरी आणि ‘रिव्हर्स सिंगल्स’ असे दोन्ही सामने शनिवारी होणार होते. दुहेरीत पेसने त्याच्याबरोबर खेळण्यास ‘नाखूष’ असलेल्या रोहन बोपण्णासह पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर चिनी जोडीला हरविले. त्यामुळे भारताने खाते उघडत पिछाडी १-२ अशी कमी केली. त्यानंतर १३२व्या स्थानावरील रामकुमारने २४८व्या स्थानावरील डी वू याला दोन सेटमध्ये गारद करीत बरोबरी साधून दिली. ‘रिव्हर्स सिंगल्स’मधील दुसऱ्या व निर्णायक पाचव्या लढतीसाठी ‘नॉन-प्लेइंग कॅप्टन’ महेश भूपती यांनी सुमीत नागल (क्रमांक २१३) याच्याऐवजी प्रज्ञेश गुणेश्वरन (२६३) याला संधी दिली. प्रज्ञेशने चीनचा प्रतिभाशाली यिबिंग वू (३३२) याला दोन सेटमध्ये हरविले. त्याच्या विजयानंतर भारतीय संघाने कोर्टवर एकच जल्लोष केला.
निकाल
रोहन बोपण्णा-लिअँडर पेस विवि माओ-झीन गाँग-झी झॅंग ५-७, ७-६ (७-५), ७-६ (७-३)
रामकुमार रामनाथन विवि डी वू ७-६ (७-४), ६-३
प्रज्ञेश गुणेश्वरन विवि यिबींग वू ६-४, ६-२
पेसचा पराक्रम
वयाच्या ४४व्या वर्षी पेसचा दुहेरीत ४२वा विजय
इटलीच्या निकोला यांनी पित्रांजेली यांचा उच्चांक मोडला
निकोला यांचे ४२ विजय-१२ पराभव
पेसची कामगिरी ४३ विजय-१३ पराभव
निकोला ६६ लढतींत सहभागी, तर पेसची ही ५६वी लढत
पेसचे वयाच्या १६व्या वर्षी १९९० मध्ये पदार्पण
दुहेरीत पेस-भूपती यांची २४ विजयांची यशोमालिका