किर्गीऑसची 'हिरो' त्सोंगावर मात 

किर्गीऑसची 'हिरो' त्सोंगावर मात 

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बालपणीचा 'हिरो' जो-विल्फ्रीड त्सोंगा याला हरवीत कारकिर्दीत महत्त्वाचा विजय नोंदविला. 17 वे मानांकन असलेल्या किर्गीऑसने 15व्या मानांकित प्रतिस्पर्ध्याला 7-6 (7-5), 4-6, 7-6 (8-6), 7-6 (7-5) असे हरविले. 

अग्रमानांकित नदालने बोस्नीयाच्या दामीर डीझुमूरला 6-1, 6-3, 6-1 असे हरविले. दुसऱ्या सेटच्या प्रारंभी नदालने सर्व्हिस गमावली; पण त्याने एक तास 50 मिनिटांत विजय मिळविला. नदालने आतापर्यंत धडाकेबाज विजय मिळविले आहेत. 

फेडररने जर्मनीच्या यान-लेनार्ड स्ट्रफचा प्रतिकार 6-4, 6-4, 7-6 (7-4) असा मोडून काढला. 55व्या क्रमांकावरील स्ट्रफ ताकदवान फटके मारतो. त्याने तिसऱ्या सेटमध्ये फेडररची सर्व्हिस भेदली. त्यानंतर सेट टायब्रेकमध्ये गेला. त्यात त्याने एक मॅचपॉइंट वाचविला. त्यानंतर मात्र फेडररने भक्कम सर्व्हिस बेसलाईनच्या कोपऱ्यात परतवित विजय नक्की केला. 

तृतीय मानांकित बल्गेरियाच्या दिमित्रोवने 30व्या मानांकित रशियाच्या आंद्रे रुब्लेवला 6-3, 4-6, 6-4, 6-4 असे हरविले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा सर्व्हिस गमावली. गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत तो रुब्लेवकडून हरला होता; पण या वेळी त्याने खेळ उंचावला. 

ब्रिटनच्या काईल एडमंडने आगेकूच कायम राखली. त्याने या स्पर्धेत प्रथमच चौथी फेरी गाठली. जॉर्जियाच्या निकोलोझ बॅसिलॅश्‍विली याचे आव्हान त्याने 7-6 (7-0), 3-6, 4-6, 6-0, 7-5 असे परतावून लावले. 70 'वीनर्स' आणि 68 'एरर्स' (सोपे फटके चुकणे) असा संमिश्र खेळ करीत एडमंडने स्वतःसह ब्रिटनच्या आशा कायम राखल्या. 

किर्गीऑसची आठवण 
त्सोंगाने 2008 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्या वर्षी किर्गीऑस 12 वर्षांचा होता. तेव्हाची आठवण सांगताना तो म्हणाला की, 'मी त्सोंगाचा सराव पाहण्यासाठी रोज जायचो. मी रोज नवा चेंडू घेऊन जायचो आणि त्सोंगाचा 'ऑटोग्राफ' घ्यायचो. त्सोंगाला हे आठवते का हे मला ठाऊक नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com