esakal | माझ्यासाठी सर्वच चुकत गेले : श्रीकांतची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikanth Kidambi

माझ्यासाठी सर्वच चुकत गेले : श्रीकांतची खंत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनंतर संपवण्याची प्रतीक्षा कायम राहिली. त्याला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सॉन वॅन हो याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. या लढतीत माझे सर्वच चुकत गेले, अशी खंत श्रीकांतने व्यक्त केली. 

जागतिक क्रमवारीत आठव्या असलेल्या श्रीकांतने या स्पर्धेत नेटजवळ हुकूमत राखली होती; पण या वेळी त्याला हेच जमले नाही आणि त्याचबरोबर खेळाची गती आपल्याला अनुकूल अशी राखण्यातही तो अपयशी ठरला. त्याला अखेर 49 मिनिटे चाललेल्या या लढतीत 14-21, 18-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताची या स्पर्धेतील पुरुष एकेरीत पदक जिंकण्याची अपेक्षा 34 वर्षांनंतरही पूर्ण झाली नाही. 

दोन सुपर सीरिज स्पर्धा लागोपाठ जिंकत अपेक्षा उंचावलेल्या श्रीकांतने या स्पर्धेत चांगली सुरवात केली होती. त्याने या स्पर्धेतील यापूर्वीच्या तीनही लढती दोन गेममध्येच जिंकल्या होत्या. त्याने कोरियन प्रतिस्पर्ध्यांना इंडोनेशिया, तसेच ऑस्ट्रेलियातील सुपर सीरिज स्पर्धेत हरवले होते. त्यामुळेच काही तज्ज्ञांच्या मते, श्रीकांतचे पारडे मानांकन कमी असतानाही सरस होते. 

नेटजवळ चुका होतात, हे लक्षात आल्यावर श्रीकांत काहीसा अस्वस्थ झाला. सुन हो हा फारसे प्रयोग करीत नाही, त्यामुळे खेळाच्या गतीत बदल करण्याचे श्रीकांतने ठरवले; पण हेही त्याला जमले नाही. ""आज काय वेगळे करायला हवे होते, तेच मला कळत नव्हते. मी सर्व काही करून पाहिले; पण कशाचाच फायदा होत नव्हता. अखेर काहीही प्रयोग करण्याऐवजी शटल जास्तीत जास्त वेळ कोर्टवर कसे राहील यासाठीही प्रयत्न केला, चुका कमी करण्याकडे लक्ष दिले; पण हेही जमले नाही. चुका जरी कमी झाल्या असत्या, तरी लढत देऊ शकलो असतो.'' 

दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने 4-11 पिछाडी असताना केलेला प्रतिकार जबरदस्त होता. त्याने वेग कमालीचा वाढवताना आक्रमण सुरू केले. त्याचे ताकदवान स्मॅश प्रभावी ठरू लागले. सलग सात गुण जिंकत त्याने पिछाडी 12-16 अशी कमी केली. त्यानंतर सलग चार गुण जिंकत पिछाडी 18-19 पर्यंत केली, पण त्याचवेळी त्याच्याकडून नेटजवळ चूक झाली आणि दुसरी गेम जिंकून बरोबरी साधण्याच्या श्रीकांतच्या आशाच संपल्या. 

श्रीकांतची या सामन्यातील सुरवात अपेक्षेइतकी चांगली नव्हती. त्याचा फटका त्याला बसला, असे मानले जात आहे. उपांत्यपूर्व लढतीचे त्याच्यावर दडपण आले होते, असेही मानले जात आहे; पण हे श्रीकांतला मान्य नाही. स्पर्धा सुरू झाल्यापासून मी एकावेळी एका सामन्याचा विचार करीत आहे. आपली कोणत्या फेरीची लढत आहे, हा विचारही कधी केला नाही. खरे सांगायचे तर माझी व्यूहरचना चुकली. ही चूक समजेपर्यंत उशीर झाला होता. 

श्रीकांतविरुद्ध परत हरल्याचा फायदा 
सॉनच्या या स्पर्धेतील वाटचालीत श्रीकांतविरुद्ध सलग दोन सुपर सीरिज स्पर्धेत हरल्याचा सॉनला फायदा झाला, असेच म्हणता येईल. या दोन पराभवांनी सॉन खूप निराश झाला होता. त्याला सतत श्रीकांतविरुद्धच्या पराभवाचा बदला हवा होता. त्याची मनःस्थिती पाहून कोरियन महासंघाने त्याच्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केली. त्यामुळेच श्रीकांतविरुद्धच्या लढतीच्या सुरवातीस सॉन कमालीचा शांत होता. तो यापूर्वी अनेकदा उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला होता. 

श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये सलग सात गुण जिंकल्यावर मी नर्व्हस झालो होतो. त्या वेळी एक गुण जिंकला तर सर्व बदलेल असेच मी स्वतःला सांगत होतो. हा दुसरा गेम गमावला असता तर काय घडले असते, याचा विचारही करायला तयार नाही, असे सॉनने सांगितले.