esakal | जिगरबाज नदालचा पिछाडीवरून विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

Nadal win against Karen Khachanov

जिगरबाज नदालचा पिछाडीवरून विजय 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

न्यूयॉर्क : गतविजेत्या रॅफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पिछाडीवरून विजय मिळविला. रशियाच्या कॅरेन खाचानोव याचे आव्हान त्याने 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) असे परतावून लावले. ताकदवान खेळ करणाऱ्या खाचनोवने पहिला सेट जिंकून पकड घेतली होती; पण 32 वर्षीय नदालने 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) अशी बाजी मारली. 22 वर्षीय खाचनोवने 22 वेळा बिनतोड सर्व्हिस केली. याशिवाय त्याने 66 "विनर्स'ही मारले. तो जागतिक क्रमवारीत 26वा आहे. यापूर्वी चार लढतींत नदालविरुद्ध तो एकही सेट जिंकू शकला नव्हता. चौथ्या सेटमध्ये 5-4 अशा आघाडीस नदालला सर्व्हिस राखण्याची गरज होती; पण त्याला टायब्रेकपर्यंत झुंज द्यावी लागली. हा सामना चार तास 23 मिनिटे चालला. नदालची आता जॉर्जियाच्या निकोलोझ बॅसिलॅश्‍विली याच्याशी लढत होईल. 

स्लोआनीची आगेकूच 
महिला एकेरीतील गतविजेत्या अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सने बेलारूसच्या व्हिक्‍टोरिया अझारेन्काला 6-3, 6-4 असे हरवून चौथी फेरी गाठली. स्लोआनीला तिसरे मानांकन आहे. अझारेन्काने 1-3 अशा पिछाडीवरून 4-3 अशी आघाडी घेतली होती, पण तिला सातत्य राखता आले नाही. 

अन्य लढतींत 15व्या मानांकित बेल्जियमच्या एलिसी मेर्टन्सने 23व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रीकोवाला 6-3, 7-6 (7-4); सातव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाने चीनच्या वॅंग क्वियांगला 6-4, 6-4; 19व्या मानांकित लॅट्‌वियाच्या अनास्ताशिया सेवास्तोवाने रशियाच्या एकातेरीना माकारोवाला 4-6, 6-1, 6-2; तर 18व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍लेग बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाला 6-3, 6-4; तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाने अमेरिकेच्या सोफिया केनीनला 6-4, 7-6 (7-2) असे हरविले.