नदालची एटीपी फायनल्समधून माघार

Rafael Nadal
Rafael Nadal

लंडन : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या रॅफेल नदालने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतून अगदी ऐनवेळी माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. नदालच्या माघारीमुळे आता मोसमाच्या अखेरच्या स्पर्धेत केवळ रॉजर फेडरर हा एकमेव स्टार खेळाडू उरला आहे. 

कधीही हार न मानणाऱ्या नदालने स्पर्धेत सहभाग घेऊन डेव्हिड गॉफिनला जबरदस्त झुंज दिली. गुडघ्याच्या दुखापतीवर मात करत त्याने चार मॅचपॉइंट वाचवले देखील होते. मात्र, त्याला विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. गॉफिनने विजय मिळवून विजयी सलामी दिली. या लढतीनंतर नदालने दुखापत अधिक बळावू नये याचा विचार करून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकलेले नाहीत. नदालनेही माघार घेतली आहे. त्यामुळे आता केवळ रॉजय फेडरर हा एकमेव वलयांकित आणि स्टार खेळाडू स्पर्धेत आपले आव्हान राखून आहे. नदालच्या गैरहजेरीत आता त्याच्याकडेच संभाव्य विजेते म्हणून बघितले जात आहे. 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे नदालला गेल्याच महिन्यात पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. ती दुखापत विसरून तो या स्पर्धेत सहभागी झाला. गॉफिनविरुद्धच्या लढतीत तो झुंजला, पण विजयाला गवसणी घालू शकला नाही. गॉफिनने लढत 7-7(7-5), 6-7(4-7), 6-4 अशी जिंकली. पराभवानंतर नदालच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, ""यंदाच्या मोसमाची माझी अखेर झाली. मला या स्पर्धेत खेळायचे होते. मी प्रयत्न देखील केला. आज मी खेळलो, पण पुढे खेळणे खरच अशक्‍य आहे.'' मोसमाची अखेर निराशाजनक झाली म्हणून मी कुढत बसणार नाही. यंदाच्या मोसमात माझा खेळ चांगलाच झाला. या कामगिरीवर मी पूर्ण समाधानी आहे, असेही नदाल म्हणाला. 

नदालच्या जागी आता जागतिक क्रमवारीत दहाव्या स्तानावर असणाऱ्या पाब्लो कॅरेनो बुस्टा याला प्रवेश देण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com