esakal | डेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळले 
sakal

बोलून बातमी शोधा

Rohan Bopanna

डेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळले 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले आहे. पुढील वर्षी पुणे येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी गुरुवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. 

भारतीय टेनिस संघटनेच्या एस. पी. मिश्रा, रोहित राजपाल, नंदन बाळ, झीशान अली आणि सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी हा संघ निवडला. गेल्या डेव्हिस करंडक लढतीत स्पेनच्या रॅफेल नदाल आणि मार्क लोपेझ यांना झुंजविणाऱ्या लिअँडर पेस आणि साकेत मैनेनी या जोडीलाच दुहेरीत पसंती देण्यात आली आहे. 

जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये बोपण्णा 28, पेस 59 आणि मैनेनी तब्बल 210व्या स्थानावर असल्यामुळे बोपण्णाला वगळण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, निवड समितीने या निर्णयाचे समर्थन केले. मिश्रा म्हणाले, ''रोहनला घेतल्यास आम्हाला एकेरीतील तिसऱ्या खेळाडूची उणीव भासते. त्याचबरोबर पेस आणि बोपण्णा जेव्हा एकत्र खेळले, तेव्हा त्यांचा खेळ चांगला झालेला नाही. चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या लढतीचे उदाहरण आपल्या समोर आहे. त्याचवेळी रोहन आणि साकेत यांचीदेखील मोट बांधता येऊ शकत नाही.'' 

बोपण्णाला वगळण्याच्या मुद्यावर अधिक ठळकपणे बोलताना मिश्रा म्हणाले, ''पेस अजून किती वर्षे खेळेल माहीत नाही. रोहनसमोर अजून खूप टेनिस खेळायचे बाकी आहे. त्यामुळे तो केव्हाही पुनरागमन करू शकतो. सोमदेवदेखील प्रदीर्घ काळ टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे त्याचा विचार केला नाही. त्याने आदी स्पर्धात्मक पातळीवर आपले पुनरागमन सिद्ध करावे. त्यानंतर त्याचा विचार केला जाईल.'' 

या लढतीसाठी युकी भांब्रीलादेखील पुनरागमनाची संधी देण्यात आली. त्यामुळे साहजिकच सुमीत नागल याला वगळण्यात आले. संघात युकी, साकेत आणि रामकुमार रामनाथन असे एकेरीतील तीन खेळाडू असतील. संघातील पाचवा खेळाडू म्हणून प्रज्ञेश गुणेश्‍वरन याला संधी देण्यात आली आहे. 

फेडरेशनसाठी संघ कायम 
निवड समितीने फेडरेशन करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ कायम ठेवला. अर्थात, तो संभाव्य असेल. या स्पर्धेतील आशिया-ओशियाना गट एकमधील सामन्यात भारत कझाकस्तानशी 6 फेब्रुवारीपासून खेळणार आहे. ही लढत अस्ताना येथे होईल. संघ सानिया मिर्झा, अंकिता रैना, स्नेहादेवी रेड्डी, कामरान थंडी, रिया भाटिया, प्रार्थन ठोंबरे.