पॅरिस - सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांनी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी पुनरागमन केले. पुरुष एकेरीत रॅफेल नदालने ११व्या विजेतेपदाचे ‘मिशन’ धडाक्यात सुरू केले.
सेरेनासमोर ७०व्या क्रमांकावरील चेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना प्लिस्कोवाचे आव्हान होते. तिने ७-६ (७-४), ६-४ असा विजय मिळविला. टायब्रेकमध्ये तिने ०-३ अशी पिछाडी भरून काढली. दुसऱ्या सेटमध्ये पाच सर्व्हिस ब्रेक झाले. यात पाचव्या गेममधील सेरेनाचा ब्रेक निर्णायक ठरला. ४५३व्या स्थानावरील सेरेनाने ७०व्या क्रमांकावरील क्रिस्टिनाविरुद्ध जिगरबाज खेळाची झलक दाखविली.

मारिया शारापोवाने नेदरलॅंड्सच्या रिचेल होगेनकॅम्पचे आव्हान ६-१, ४-६, ६-३ असे परतावून लावले. १३४व्या स्थानावरील रिचेलविरुद्ध २८व्या मानांकित शारापोवाने पहिला सेट २६ मिनिटांत जिंकला. पहिल्या गेममध्ये रिचेलला केवळ दोन गुण जिंकता आले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र रिचेलने चुरशीच्या रॅलींमध्ये सरस खेळ केला. त्यातच शारापोवाचे काही फटके चुकले. हा सेट जिंकून रिचेलने बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये शारापोवाने पहिले दोन गेम गमावले होते. त्यानंतर मात्र तिने इच्छाशक्ती आणि मनोधैर्याच्या जोरावर विजय खेचून आणला.
नदाल विजयी
स्पेनच्या रॅफेल नदाल याने ११व्या फ्रेंच विजेतेपदाचे ‘मिशन’ अपेक्षेप्रमाणे विजयाने सुरू केले. त्याने इटलीच्या सायमन बॉलेल्ली याचे आव्हान ६-४, ६-३, ७-६ (११-९) असे परतावून लावले.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काल अर्धवट राहिला होता. त्या वेळी नदालने तिसऱ्या सेटमध्ये पहिले तीन गेम गमावले होते. आज त्याने टायब्रेकमध्ये गेलेला सेट जिंकून आगेकूच केली.
शापोवालोवची सरशी
नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न टेनिसपटूंमध्ये गणना होणाऱ्या कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याने रोलाँ गॅरोवर विजयी पदार्पण केले. मुख्य ड्रॉमधील पहिल्याच सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याचा ७-५, ६-४, ६-२ असा पराभव केला. शापोवालोव १९ वर्षांचा आहे. गेल्या वर्षी तो पात्रता फेरीत हरला होता. या वेळी मात्र त्याला २४वे मानांकन आहे. त्याची प्रगती विलक्षण ठरली आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत त्याला प्रथमच मानांकन मिळाले आहे.
मुगुरुझाची सरशी
माजी विजेत्यांच्या लढतीत २०१६ मधील विजेत्या स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने २००९ मधील विजेत्या रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाला ७-६ (७-०), ६-२ असे हरविले. पहिल्या सेटमध्ये ५-५ अशा स्थितीस पावसामुळे दीड तास व्यत्यय आला. मुगुरुझाने नेटजवळ धाव घेत केलेला आक्रमक खेळ निर्णायक ठरला.