esakal | ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डनकडून अँडी मरे चकित
sakal

बोलून बातमी शोधा

लंडन - अँडी मरेविरुद्ध परतीचा फटका मारताना जॉर्डन थॉमसन.

ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डनकडून अँडी मरे चकित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

द्वितीय मानांकित वॉव्रींकासह मिलॉसलाही धक्का
लंडन - गतविजेत्या अँडी मरेला एगॉन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत ९०व्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनने त्याला चकित केले.

थॉमसनला ऐनवेळी प्रवेश मिळाला होता. अल्जाझ बेडेने याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यामुळे त्याला लकी लूझर म्हणून संधी मिळाली होती. याचा पुरेपूर फायदा घेत त्याने धडाकेबाज खेळ केला. मरेला या स्पर्धेत २०१२ नंतर प्रथमच पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले. तेव्हा फ्रान्सच्या निकोलस माहूत याच्याकडून तो हरला होता.

मरे म्हणाला की, हा मोठाच धक्का आहे. या स्पर्धेत चांगला खेळ होऊ शकला नाही, पण विंबल्डनमध्ये उत्तम खेळ झाला असे पूर्वी घडले आहे. अर्थात इथे आणखी काही सामने खेळता आले असते तर तयारी छान झाली असती. माझे परतीचे फटके चांगले बसले नाहीत. थॉमसनने भक्कम सर्व्हिस केली. त्याने सरस खेळ केला.

थॉमसन २३ वर्षांचा आहे. तो सिडनीचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी त्याला एटीपीच्या मुख्य ड्रॉमध्ये एकही विजय मिळविता आला नव्हता. गेल्या आठवड्यात त्याने सुर्बिटॉन चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याने एक तास ४३ मिनिटांत कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय साकार केला. त्याने बिनतोड सर्व्हिसने विजयावर शिक्कामोर्तब केले. मरे याच्याकडे आदर्श म्हणून पाहत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, मी एकावेळी एका गुणाचा विचार केला. दोन सेटमध्ये जिंकण्याची मला आशा नव्हती.द्वितीय मानांकित स्टॅन वॉव्रींका आणि तृतीय मानांकित मिलॉस राओनीच यांचे आव्हानही संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोक्कीनाकीस याने गतउपविजेत्या मिलॉसला ७-६ (७-५), ७-६ (१०-८) असा धक्का दिला. माजी उपविजेत्या स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ याने वॉव्रींकावर ७-६ (७-४), ७-५ अशी मात केली.

यशोमालिका संपुष्टात
या पराभवामुळे मरेची ग्रास कोर्टवरील १४ विजयांची मालिका संपुष्टात आली. मरेने २०१५ पासून ग्रास कोर्टवर प्रभावी कामगिरी केली होती. ही स्पर्धा त्याच्यासाठी महत्त्वाची होती. २०१३ तसेत २०१६ मध्ये त्याने विंबल्डन जिंकले होते. त्याआधी त्याने दोन्ही वेळा ही स्पर्धा जिंकली होती.