esakal | चुंगची जायबंदी जोकोविचवर मात
sakal

बोलून बातमी शोधा

मेलबर्न - नोव्हाक जोकोविचला हरवल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन करताना दक्षिण कोरियाचा हिऑन चुंग.

चुंगची जायबंदी जोकोविचवर मात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेलबर्न - दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंगने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविला तीन सेटमध्ये हरवित उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या सेटनंतर जोकोविचने उजव्या कोपरावरील उपचारासाठी ‘मेडिकल ब्रेक’ घेतला. सामन्यादरम्यान त्याला त्रास होत असल्याचे अनेकदा जाणवले. चुंगने ७-६ (७-४), ७-५, ७-६ (७-३) असा विजय मिळविला.

ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत इतकी मजल मारलेला तो दक्षिण कोरियाचा पहिलाच टेनिसपटू ठरला. २१वर्षीय चुंग जागतिक क्रमवारीत ५८व्या स्थानावर आहे. जोकोविचने आधीच्या फेऱ्यांत केवळ एक सेट गमावला होता. सहा वेळच्या विजेत्या जोकोविचविरुद्ध चुंगने दीर्घ रॅलीत मारलेले ‘व्हीपिंग फोरहॅंड’ आणि ‘बॅकहॅंड पासिंग रिटर्न’ निर्णायक ठरले. अनेक वेळा असे फटके परतविताना जोकोविच अडखळला. काही वेळा नेटमध्ये चेंडू गेला, तर काही वेळा जोकोविच चेंडूपर्यंत पोचूच शकला नाही. जोकोविचला मागील वर्षी डेनिस इस्तोमीनकडून पराभूत व्हावे लागले होते. विंबल्डननंतर त्याला कोपराच्या दुखापतीमुळे मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यास मुकावे लागले होते. जागतिक क्रमवारीत त्याची १४व्या क्रमांकावर घसरण झाली होती. मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत त्याच्या पुनरागमनाकडे साऱ्या टेनिस जगताचे लक्ष होते; पण दुर्दैवाने जोकोविचला आधीच्या दुखापतीचा त्रास होणे चाहत्यांसाठी निराशाजनक ठरले. तिन्ही सेटमध्ये जोकोविचने पिछाडी भरून काढत शर्थीचे प्रयत्न केले. पहिल्या सेटमध्ये ०-४, दुसऱ्यात १-४; तर तिसऱ्यात तो १-३ असा मागे पडला होता; पण चुंगने १९ पैकी १४ ब्रेकपॉइंट वाचविले. दुसरीकडे जोकोविचचे फटके ५७ वेळा चुकले. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविच बेसलाइनवर चेंडू मारताना वेदना झाल्यामुळे कळवळला. तिसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये जोकोविचने ०-३ पिछाडी भरून काढली होती; पण अखेरीस तो तीन तास २१ मिनिटांत हरला.

फेडररचा विजय
गजविजेत्या रॉजर फेडररने ८०व्या स्थानावरील हंगेरीच्या मारटॉन फुकसोविक्‍सला ६-४, ७-६ (७-३), ६-२ असे हरविले. मारटॉनने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत यापूर्वी एकही सामना जिंकला नव्हता; पण पहिले दोन सेट त्याने फेडररला झुंजविले.

टोमास बर्डीचने इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याचे आव्हान ६-१, ६-४, ६-४ असे सहज परतावून लावले. त्याने ११ पैकी सहा ब्रेकपॉइंट जिंकले. बर्डीचलासुद्धा गेल्या मोसमात दुखापतींनी ग्रासले होते.

सॅंडग्रेनचीही कमाल
अमेरिकेच्या ९७व्या क्रमांकावर असलेल्या टेनिस सॅंडग्रेन यानेही कमाल केली. पाचवे मानांकन असलेल्या; तसेच संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमला ६-२, ४-६, ७-६ (७-४), ६-७ (७-९), ६-३ असे हरविले. पाचव्या सेटच्या सहाव्या गेममध्ये त्याने ब्रेक मिळविला. पदार्पणात उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम त्याने केला.

महिला एकेरीचे निकाल (चौथी फेरी) - मॅडिसन किज (अमेरिका १७) विवि कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स ८) ६-३, ६-२. अँजेलिक केर्बर (जर्मनी २१) विवि स्यू वेई ह्‌सिह ४-६, ७-५, ६-२. सिमोना हालेप (रुमानिया १) वि.वि. नाओमी ओसाका (जपान) ६-३, ६-२. 
कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक ६) विवि बार्बरा स्ट्रिकोवा (चेक २४) ६-७ (५-७), 
६-३, ६-२.

व्यावसायिक क्रीडापटू म्हणून वेदना होत असतानाही तुम्ही खेळता. तुम्हाला तशी सवय असते. माझी दुखापत माघार घेण्याइतकी गंभीर नव्हती; पण त्यामुळे सर्व्हिसवर परिणाम होत होता. चुंग प्रत्येक चेंडू परतवितो. त्यामुळे खेळणे अवघड होते, मी दुखापतीबद्दल जास्त भाष्य करणार नाही, कारण त्यामुळे चुंगचे श्रेय कमी केल्यासारखे होईल. 
- नोव्हाक जोकोविच

नोव्हाकला कसे हरविले मला माहीत नाही. त्याच्याविरुद्ध खेळायला मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. तो ‘टूर’वर परतल्यामुळे फार छान झाले. तो माझा आदर्श आहे. मी त्याच्या शैलीचे अनुकरण करण्याचाच प्रयत्न करीत होतो.
- हिऑन चुंग