बर्डीचला हरवून फेडरर उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 January 2018

मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हॉकआय व्हिडिओ बिघडल्यामुळे फेडररचा पंचांशी झालेला वाद हाच या लढतीचा एक अपवाद ठरला.

मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हॉकआय व्हिडिओ बिघडल्यामुळे फेडररचा पंचांशी झालेला वाद हाच या लढतीचा एक अपवाद ठरला.

फेडररने तीन सेटमध्ये विजय मिळविला असला तरी त्याला थोडे झगडावे लागले. पहिल्या सेटमध्ये तो पिछाडीवर होता. बर्डीचला ५-३ अशा आघाडीस केवळ सर्व्हिस राखण्याची गरज होती. फेडररने एक सेट पॉइंट वाचविताना बॅकहॅंडचा अप्रतिम फटका मारला. त्यानंतर त्याने बर्डीचची सर्व्हिस ब्रेक केली. हा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर फेडररने एकच गुण गमावला. तिसऱ्या सेटमध्ये फेडररने एकदा सर्व्हिस गमावली होती. त्याने सलग नवव्या सामन्यात बर्डीचला हरविले. कारकिर्दीत ४३ व्या वेळी त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. यात ११ वेळा त्याने एकही सेट न गमावता ही कामगिरी केली आहे.

चिवट चुंगची आगेकूच
दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंगने आगेकूच कायम राखली. त्याने ९७ व्या स्थानावरील अमेरिकेच्या हिऑन चुंगचे आव्हान ६-४, ७-६ (७-५), ६-३ असे परतावून लावले. अलेक्‍झांडर झ्वेरेव आणि नोव्हाक जोकोविच यांच्याप्रमाणेच सॅंडग्रेनने चुंगविरुद्ध ताकदवान फटके मारण्याचे डावपेच अवलंबिले, पण चिवट चुंगने चेंडू परतविण्याची जिगर दाखविली. त्यामुळे सॅंडग्रेनही जेरीस आला. स्पर्धेपूर्वी चुंगची तरुण प्रतिभाशाली खेळाडूंमध्येसुद्धा गणना झाली नव्हती, पण आता २१ वर्षांचा चुंग ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा कोरियाचा पहिलाच स्पर्धक ठरला आहे.

सिमोना-अँजेलिक लढत
महिला एकेरीत रुमानियाची सिमोना हालेप आणि जर्मनीची अँजेलिक केर्बर यांच्यात उपांत्य लढत होईल. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोनाने चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवाला ६-३, ६-२ असे हरविले. तिची सुरवात मात्र डळमळीत झाली होती. ०-३ असा पिछाडीनंतर तिने सलग नऊ गेम जिंकले. सिमोनाने सांगितले की, ‘माझी सुरवात सर्वोत्तम झाली नाही. मला सावरणे अनिवार्य होते. त्यामुळे मी ‘फुटवर्क’मध्ये सुधारणा केली.’

अँजेलिकने अमेरिकेच्या मॅडीसन कीजचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडविला. तिने ५१ मिनिटांतच सामना जिंकला. मॅडीसनला सर्व्हिसने दगा दिला. सर्व्हिसवर तिला ४६ पैकी केवळ १८ गुण जिंकता आले. पहिल्या चार फेऱ्यांत मॅडीसनने २६ बिनतोड सर्व्हिस केल्या होत्या, पण यावेळी पहिल्या तीन गेममध्ये तिचे फटके आठ वेळा चुकले. त्यामुळे ती ०-३ अशी मागे पडली. ३-२ अशा स्थितीस तिने ‘लव्ह’ने ब्रेक मिळविला, पण त्यानंतर तिचा खेळ पुन्हा ढेपाळला. तिने एकूण सहा वेळा सर्व्हिस गमावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australian open tennis competition