esakal | शारापोवाचा केर्बरकडून धुव्वा

बोलून बातमी शोधा

शारापोवाचा केर्बरकडून धुव्वा
शारापोवाचा केर्बरकडून धुव्वा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न - जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या बहुचर्चित लढतीत मारिया शारापोवाचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडविला.

सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत आणि व्हीनस विल्यम्सच्या पराभवानंतर महिला एकेरीत ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविलेल्या शारापोवा व अँजेलिक या केवळ दोन स्पर्धक आहेत. त्यांच्यातील लढतीला जणू काही अंतिम सामन्याचे महत्त्व प्राप्त झाले होते. ड्रॉ समारंभाच्या वेळी शारापोवाला कोर्टवर करंडक आणण्याचा बहुमान देण्यात आला. त्यामुळे काही तज्ज्ञांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अनेक समकालीन खेळाडू सुद्धा शारापोवाच्या विरोधात आहेत.

याच स्पर्धेत २०१६ मध्ये शारापोवा ‘ड्रग टेस्ट’मध्ये दोषी आढळली होती. तिला १५ महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेद्वारे ग्रॅंड स्लॅम यश मिळविण्याची शारापोवाची इच्छा होती, पण अँजेलिकने तिला एकतर्फी पराभव पत्करण्यास भाग पाडले. पहिल्या गेममध्ये तिच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. 

झ्वेरेव पराभूत
‘वंडरकिड’ अशी गणना झालेल्या जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेवला आणखी एक धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ५८व्या स्थानावरील हिऑन चुंगने त्याला ५-७, ७-६ (७-३), २-६, ६-३, ६-० असे हरविले. झ्वेरेवला चौथे मानांकन होते. त्याची संभाव्य विजेता अशी गणना झाली होती, पण २० वर्षांच्या झ्वेरेवला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुन्हा निराशाजनक अपयश आले.

जोकोविचचा ‘मेडिकल ब्रेक’
नोव्हाक जोकोविचने स्पेनच्या अल्बर्ट रॅमोस-व्हिनोलासला ६-२, ६-३, ६-३ असे हरविले. दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस राखून २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर जोकोविचने ट्रेनरला बोलावून पाठीच्या खालच्या भागावर उपचार करून घेतले. नंतर त्याला कोणताही त्रास जाणवला नाही. पुढच्याच गेममध्ये ब्रेक मिळवीत त्याने पकड कायम राखली. दोन तास २१ मिनिटांत त्याने सामना जिंकला.

डेल पोट्रो पराभूत
अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्याविरुद्ध दणदणीत विजय मिळविण्याचा पराक्रम टोमास बर्डीचने केला. या स्पर्धेपूर्वी डेल पोट्रोने ‘टॉप टेन’ मध्ये २०१४ नंतर प्रथमच प्रवेश केला होता, पण बर्डीचकडून तो ३-६, ३-६, २-६ असे हरला. बर्डीचने ५२ ‘वीनर्स’ मारले. डेल पोट्रोविरुद्ध याआधी आठ लढतींत तो पाच वेळा हरला होता. त्यामुळे हा विजय सुखद ठरला.

सिमोनाचा लढा
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपने अमेरिकेच्या लॉरीन डेव्हिसचे आव्हान ४-६, ६-४, १५-१३ असे मोडून काढले. तीन तास ४४ मिनिटे चाललेल्या लढतीत तीन मॅचपॉइंट वाचविले.

फेडररचा धडाका
गतविजेत्या रॉजर फेडररने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केला ६-२, ७-५, ६-४ असे सहज हरविले. गास्केला २९वे मानांकन होते, पण तो फेडररसमोर फारसे आव्हान निर्माण करू शकला नाही.