मेदवेदेवने नाण्यांसह गुणही उधळले

पीटीआय
Friday, 7 July 2017

लंडन - स्टॅन वॉव्रींकावरील विजयानंतर प्रकाशझोतात आलेल्या डॅनील मेदवेदेवची प्रतिष्ठा २४ तासांत धुळीस मिळाली. बुधवारी दुसऱ्या फेरीत बेल्जियमच्या रूबेन बेमेलमान्सविरुद्ध हरल्यानंतर त्याने पंचांच्या खुर्चीच्या दिशेने नाणी फेकली. त्यामुळे त्याच्यावर गंभीर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

लंडन - स्टॅन वॉव्रींकावरील विजयानंतर प्रकाशझोतात आलेल्या डॅनील मेदवेदेवची प्रतिष्ठा २४ तासांत धुळीस मिळाली. बुधवारी दुसऱ्या फेरीत बेल्जियमच्या रूबेन बेमेलमान्सविरुद्ध हरल्यानंतर त्याने पंचांच्या खुर्चीच्या दिशेने नाणी फेकली. त्यामुळे त्याच्यावर गंभीर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

दोन तास ५० मिनिटे चाललेल्या लढतीत मेदवेदेव ४-६, २-६, ६-३, ६-२, ३-६ असा हरला. लढतीत पंचांच्या अनेक निर्णयांवर त्याने नाराजी दर्शविली होती. सामन्यानंतर त्याने पोर्तुगालच्या महिला पंच मरियाना अल्वेझ यांच्याशी औपचारिक हस्तांदोलन केले. त्यानंतर तो आपल्या खुर्चीपाशी गेला. त्याने किट बॅगमधून पाकीट काढले. त्यातून एकेक करून नाणी काढत त्याने ती पंचांच्या पंचांच्या खुर्चीपाशी टाकली.

सामन्यादरम्यान त्याने पंचांना हटविण्याची विनंती केली होती, पण ती फेटाळून लावण्यात आली होती. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने माफी मागितली. त्या वेळी त्याला पश्‍चात्ताप झाल्यासारखे जाणवले.

गुरुवारी द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविचने चेक प्रजासत्ताकाच्या ॲडम पावलासेकचे आव्हान ६-२, ६-२, ६-१ असे किरकोळीत परतावून लावले. १३व्या मानांकित ग्रिगॉर दिमीत्रोवने सायप्रसच्या मार्कोस बघदातीस याचा ६-३, ६-२, ६-१ असा पराभव केला.

महिला एकेरीत स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने रशियाच्या एकातेरीना माकारोवाला ६-०, ७-५ असे हरवून तिसरी फेरी गाठली.

अँडी मरेने जर्मनीच्या डस्टीन ब्राऊनला ६-३, ६-२, ६-२ असे हरवीत धडाका राखला. ब्राऊन हा धोकादायक प्रतिस्पर्धी मानला जातो. त्याने २०१५ मध्ये रॅफेल नदालला दुसऱ्याच फेरीत गारद केले होते. अशा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भक्कम सर्व्हिस करणे, आणि पासिंग तसेच परतीचे चांगले फटके मारणे मरेसाठी महत्त्वाचे ठरले. 

पेसचा पराभव
कॅनडाचा जोडीदार आदिल शमास्दीन याच्या साथीत लिअँडर पेस पहिल्याच फेरीत पराभूत झाला. ऑस्ट्रियाच्या ज्युलीयन नोल- फिलीप ओस्वाल्ड या जोडीने त्यांना ४-६, ४-६, ६-२, ७-६ (७-२), १०-८ असे हरविले.

सानियाची विजयी सलामी
सानियाने बेल्जियमची नवी जोडीदार कर्स्टीन फ्लिपकेन्स हिच्या साथीत विजयी सलामी दिली. नाओमी ओसाका (जपान)-शुआई झॅंग (चीन) या जोडीवर त्यांनी ६-४, ६-३ अशी मात केली. हा सामना एक तास १२ मिनिटे चालला. सानिया-कर्स्टीनला १३वे मानांकन आहे. जीवन नेदूंचेझीयनचा अमेरिकी जोडीदार जॅरेड डोनाल्डसन याच्या साथीत पराभव झाला. जेय क्‍लार्क-मार्कस विलीस या ब्रिटिश जोडीने त्यांना ७-६ (७-४), ७-५, ६-७ (३-७), ०-६, ३-६ असे हरविले.

सामन्याच्या निकालामुळे मी निराश झालो होतो. आधीच्या फेरीत मोठा विजय मिळविल्यानंतर पराभूत होणे निराशाजनक ठरले. सामना माझ्यासाठी चांगला ठरत नव्हता. भावनेच्या भरात मी वाईट कृत्य केले. मी किट बॅग पॅक करीत होतो. त्याच वेळी मला पाकीट दिसले. त्यानंतर मी असे का केले हेच समजत नाही. मला यातून काही सुचवायचे नव्हते. पंचांचे काही ‘कॉल्स’ कदाचित खराब होते, पण असे खेळात घडू शकते.
- डॅनील मेदवेदेव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Danil Medvedev