esakal | राखीवच असल्यामुळे शरणची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

divij sharan

राखीवच असल्यामुळे शरणची माघार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक संघातील दुहेरीचा राखीव खेळाडू दिवीज शरणने लढतीसाठी चीनला न जाण्याचे ठरवले आहे. संघाला अगदीच गरज भासली, तर आपण चीनला जाण्यास तयार आहोत, असे त्याने भारतीय टेनिस संघटनेला कळवले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील डेव्हिस करंडक लढत ६ आणि ७ एप्रिलला तिआनजीन येथे होईल. दुहेरीसाठी भारताने रोहन बोपण्णा  आणि लिअँडर पेसची निवड केली आहे. युकी भांब्रीने यापूर्वीच माफक दुखापतीचे कारण देत लढतीतून माघार घेतली आहे. आता दिवीज शरणही चीनला जाणार नसल्यामुळे ऐन वेळी दुहेरीतील एखादा खेळाडू जखमी झाल्यास प्रश्‍न येऊ शकेल.

दुहेरीच्या भारतीय क्रमवारीत शरण दुसरा आहे, पण पेसच्या अनुभवास पसंती देण्यात आली. शरण सध्या अमेरिकेत आहे. तिथेच तो सराव करणार आहे. आवश्‍यकता असेल, तर आपण चीनला येण्यास तयार आहोत, असे त्याने कळवले असल्याचे भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोन्मय चटर्जी यांनी सांगितले. टेनिस संघटनेने शरणची विनंती स्वीकारली असली, तरी त्याचा निर्णय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनास रुचलेला नाही. 

भारतीय टेनिसपटू काही वर्षांपासून जास्तच आपल्या मागण्यांसाठी आग्रही होत आहेत. त्यामुळे आता खेळाडूंसाठी आचारसंहिता आणण्याचा विचार भारतीय टेनिस संघटना करीत आहे. भारतीय टेनिसपटूंची वर्षातून एखाद-दोन आठवडेही देशासाठी देण्याची तयारी नसते, अशी प्रतिक्रिया टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीच डेव्हिस संघ लढतीपूर्वी काही दिवस अगोदर लढतीच्या ठिकाणी जात असतो. निवडीनंतरही संघासोबत न जाणे कितपत योग्य आहे. आगामी बैठकीत याबाबत नक्कीच चर्चा होईल.
- एस. पी. मिश्रा, निवड समिती प्रमुख.