मल्लिका मराठेची टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय भरारी

मुकुंद पोतदार
Thursday, 25 May 2017

टेनिसपटू मल्लिका मराठे हिने फ्रेंच ओपन ज्युनिअर पात्रता स्पर्धेचे तिकीट कमावले आहे. त्यासाठी झालेल्या स्पर्धेत तिने वय, अनुभवात सरस असलेल्यांवर मात केली. कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे.

पुण्याची १४ वर्षांची टेनिसपटू मल्लिका मराठे हिने फ्रेंच ओपनमधील ज्युनिअर गटाच्या पात्रता फेरीसाठी ‘वाइल्ड कार्ड’ मिळविले आहे. त्यासाठी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत तिने विजेतेपद मिळविले. तिने वरच्या वयोगटातील मुलींना हरवून ही कामगिरी केली. १६ वर्षांखालील गटाच्या युर्बानी बॅनर्जीवर तिने मात केली. तीन शहरांत फेऱ्या झालेल्या स्पर्धेच्या मालिकेत सहभागी झालेली ती सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. त्यामुळे तिची कामगिरी आणखी कौतुकास्पद ठरली. यामुळे कारकिर्दीतील पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून ग्रॅंड स्लॅमचा संदर्भ ती कमावू शकली.

मल्लिकाचे पहिले प्रशिक्षक संदीप कीर्तने यांनी सांगितले की, मल्लिकाच्या शब्दकोशात दडपण, भीती हे शब्दच नव्हते. मला तिचा हा गुण सर्वाधिक आवडला. तिला खेळाची आवड सुद्धा होती. ती खेळाचा आनंद लुटायची हे सुद्धा सांगावे लागेल. तिला नव्या गोष्टी शिकण्यात रस होता. वयाच्या मानाने तिचा दृष्टिकोन जास्त परिपक्व होता.

अर्जुन पुरस्काराचे मानकरी असलेले संदीप तसेच मल्लिकाची आई वैजयंती आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतात आणि तो म्हणजे तिला पराभवाची भीती वाटत नाही.

टेनिसच नव्हे तर कोणताही खेळ मानसिक असतो. उत्तुंग कामगिरी केलेला एखादा खेळाडू झोनमध्ये गेलेला असतो, असे म्हटले जाते. ही अवस्था साधण्यासाठी साधकाप्रमाणे तपश्‍चर्या करावी लागते. मल्लिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने ज्युनिअर पातळीवरच ही स्थिती साध्य केली आहे. वैजयंती यासाठी एक उदाहरण आवर्जून देतात. अहमदाबादमधील स्पर्धेच्यावेळी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. त्याचवेळी मल्लिकाच्या पायाला फोड आले होते. त्यामुळे तिचे पाय दुखत होते. त्यानंतरही तिने विजेतेपद पटकावले.

मल्लिकाचा एक डोळा लहानपणी थोडा नाजूक होता. अँब्लीओपिया असे यास संबोधले जाते. यावर मल्लिकाने मात केली. ज्युनिअर पातळीवर दीर्घ काळ सातत्य राखणे खडतर असते. मल्लिकाने त्यात यश मिळविले आहे. पुढे वरिष्ठ पातळीचा मार्ग खडतर असेल, पण ज्युनिअर पातळीवरील मल्लिकाची परिपक्वता पाहता ती हे आव्हान पेलेल असा विश्‍वास वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news mallika marathe involve in international tennis competition