शारापोवाची सनसनाटी सलामी

पीटीआय
Wednesday, 30 August 2017

न्यूयॉर्क - रशियाच्या मारिया शारापोवाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सनसनाटी सलामी दिली. द्वितीय मानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपला तिने ६-४, ४-६, ६-३ असे पराभूत केले. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे तिला बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे. ‘वाइल्ड कार्ड’च्या संधीचा तिने फायदा उठविला.

न्यूयॉर्क - रशियाच्या मारिया शारापोवाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सनसनाटी सलामी दिली. द्वितीय मानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपला तिने ६-४, ४-६, ६-३ असे पराभूत केले. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे तिला बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे. ‘वाइल्ड कार्ड’च्या संधीचा तिने फायदा उठविला.

शारापोवा ३० वर्षांची आहे. तिने दोन तास ४४ मिनिटांत चिवट विजय नोंदविला. १५ महिन्यांच्या बंदीनंतर ती ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. तिला विविध स्पर्धांत ‘वाइल्ड कार्ड’ मिळाले. त्यावरून वाद झाला. काही विद्यमान खेळाडूंनी शारापोवाला असे झुकते माप देण्यास विरोध दर्शविला होता. यात सिमोनाचाही समावेश होता. त्यामुळे फ्रेंच ओपनसाठी मात्र शारापोवाला वाइल्ड कार्डची संधी नाकारण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर हा विजय शारापोवासाठी महत्त्वपूर्ण ठरला. दुसऱ्या सेटमध्ये शारापोवाने ४-१ अशी आघाडी घेतली होती, पण सिमोनाने सलग पाच गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये शारापोवाची जिगर सरस ठरली.

व्हिनसचा विक्रमी सहभाग
अमेरिकेची ३७ वर्षांची व्हिनस विल्यम्स १९व्या वेळी सहभागी झाली आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये हा सहभाग विक्रमी आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण करणाऱ्या  स्लोव्हाकियाच्या व्हिक्‍टोरिया कुझ्मोवाने तिला झुंजविले. व्हीनसने ६-३, ३-६, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. कुझ्मोवा १३५व्या स्थानावर आहे.

इतका कसून सराव तुम्ही का करता, असा प्रश्‍न कधी कधी पडतो; पण जेव्हा असे निकाल नोंदविता येतात तेव्हा ‘नेमके याचसाठी’ असे लक्षात येते. सिमोनाविरुद्ध मी यापूर्वी कधीही हरले नसले, तरी मला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. या वेळीही विजय कमवावा लागला.
- मारिया शारापोवा

झ्वेरेवला झुंजविले
पुरुष एकेरीत संभाव्य विजेता अशी गणना झालेल्या जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेव याला झुंज द्यावी लागली. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या बार्बाडोसच्या डॅरियन किंगचे आव्हान ७-६ (११-९), ७-५, ६-४ असे मोडून काढले. किंग हा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सहभागी झालेला बार्बाडोसचा पहिलाच टेनिसपटू ठरला होता. झ्वेरेवने गुडघ्यापर्यंत सॉक्‍स तसेच ‘हेडबॅंड’ घातला होता. १९७०च्या दशकात बियाँ बोर्ग अशीच वेशभूषा करायचा. कोर्टवर त्याला स्थिरावण्यास वेळ लागला. एक तास २१ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये त्याचे फटके ३१ वेळा चुकले. अखेर सुमारे तीन तास चाललेली लढत त्याने जिंकली. आता त्याच्यासमोर क्रोएशियाच्या बॉर्ना कॉरीच याचे आव्हान असेल.

क्रोएशियाच्या २०१४ मधील विजेत्या मरिन चिलीचने १०५व्या क्रमांकावरील अमेरिकेच्या टेनिस सॅंडग्रेनचे आव्हान ६-४, ६-३, ३-६, ६-३ असे परतावून लावले. चिलीचला विंबल्डनच्या अंतिम फेरीत रॉजर फेडरर याच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्या वेळी त्याला मांडीच्या दुखापतीने त्रस्त केले होते.

इतर प्रमुख निकाल 
(पहिली फेरी) ः पुरुष एकेरी ः जॉन इस्नर (अमेरिका १०) विवि पिएर-ह्यूजेस हर्बर्ट (फ्रान्स) ६-१, ६-३, ४-६, ६-३. जॉर्डन थॉमसन (ऑस्ट्रेलिया) विवि जॅक सॉक (अमेरिका १३) ६-२, ७-६ (७-२), १-६, ५-७, ६-४. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा (फ्रान्स ८) विवि मॅरीयूस कॉपील (रुमानिया) ६-३, ६-३, ६-४.

महिला एकेरी ः स्लोआनी स्टीफन्स (अमेरिका) विवि रॉबर्टा विंची (इटली) ७-५, ६-१. अलेक्‍झांड्रा क्रुनिच (सर्बिया) विवि योहाना काँटा (ब्रिटन ७) ४-६, ६-३, ६-४. कॅरोलिन वॉझ्नीयाकी (डेन्मार्क ५) विवि मिहाएला बुझार्नेस्कू (रुमानिया) ६-१, ७-५.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Maria Sharapova tennis