esakal | नदालची जेतेपदाची दशकपूर्ती

बोलून बातमी शोधा

नदालची जेतेपदाची दशकपूर्ती
नदालची जेतेपदाची दशकपूर्ती
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस - रॅफेल नदालने आपणच क्‍ले कोर्टचे बादशाह आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याने विक्रमी दहाव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकताना स्टॅन वॉव्रींकाला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. दोघांतील लढत पाच सेटपर्यंत होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरवत त्याने चाहत्यांच्या ‘लाँग लिव्ह दी किंग ऑफ क्‍ले’ या अपेक्षा सार्थ ठरवल्या.

नदाल बहरात असतो त्या वेळी निकाल ठरलेलाच असतो. केवळ प्रतिस्पर्धी आणि स्कोअर बदलतो. या वेळी त्याचा प्रतिस्पर्धी स्टॅन वाव्रींका होता आणि नदालने लढत ६-२, ६-३, ६-१ अशी सहज जिंकली. लढत सुरू झाल्यापासून नदालने घेतलेली पकड कधीही गमावली नाही. त्याचा खेळ पाहून, यशोशिखर पुन्हा एकदा गाठलेले पाहून नदालचे मार्गदर्शक तसेच त्याचे काका टोनी नदाल जास्त खूश झाले होते. त्यांना अश्रू आवरत नव्हते. आपल्या मार्गदर्शक पदाची सांगता विजेतेपदाने झाली याचा त्यांना सार्थ अभिमान होता. त्यांनी यापूर्वीच या स्पर्धेनंतर रॅफेलचे मार्गदर्शकपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.

नदालचे यंदाचे विजेतेपद जास्तच खास होते. दुखापतीमुळे घ्याव्या लागलेल्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केल्यावर त्याचा सूर हरपला होता. त्या वेळी त्यालाही विजेतेपदाची दशकपूर्ती साध्य होईल असे वाटले नव्हते, पण आपल्या कर्मभूमीत आल्यावर नदाल बहरत गेला आणि अंतिम फेरीत तर प्रतिस्पर्धी स्टॅन वॉव्रींका याला काय करावे तेच सुचत नव्हते. या परिस्थितीत नदालने बाजी मारली नसती तरच नवल होते. विजेतेपदाचा गुण जिंकल्यानंतर नदालने डोळे मिटून घेतले. 

विक्रमी नदाल
एकच स्पर्धा दहा वेळा जिंकणारा नदाल पहिलाच पुरुष टेनिसपटू
मार्गारेट कोर्टने ११ वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे
नदालचे हे पंधरावे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद
या विजेतेपदामुळे सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाच्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळविताना पॅट सॅम्प्रासला मागे टाकले
नदालने अंतिम फेरीपूर्वी या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही
रेयालने बाराव्यांदा चॅंपियन्स लीग जिंकल्यानंतर नदालही दहाव्यांदा फ्रेंच ओपन जिंकणार याबाबत स्पॅनिश क्रीडाप्रेमींत एकमत होते