गतविजेता बोपण्णा ‘पुणेकर’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 January 2018

लिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही.

लिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही.

हे सारे घडत असताना दुहेरीत या दोघांइतका करिश्‍मा नसलेल्या भारतीयाने तिरंगा फडकावित ठेवला आहे. त्याचे नाव रोहन बोपण्णा. जागतिक क्रमवारीत त्याने टॉप टेनमधील स्थान सातत्याने टिकविले आहे. २०१३ मध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली होती. असा हा बोपण्णा मूळचा कुर्गचा असला तरी त्याचे पुण्याशी नाते आहे. १९९४ ते ९९ दरम्यान तो पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. पुण्यात तो सॅटेलाईट मालिकांत खेळला आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार फ्रान्सचा एदुआर्द रॉजर-वॅसेलीन आहे. त्याने मोसमाच्या प्रारंभी दोन आठवड्यांचे ब्रेक घेणार असल्याचे कळविले. त्यामुळे बोपण्णाला चेन्नईत देशबांधव जीवन नेदून्चेझीयन याच्या साथीत मिळविलेले विजेतेपद राखण्याची संधी मिळाली. ज्या पुण्यात काही काळ राहता आले तेथे नव्या मोसमाचा प्रारंभ करण्यास बोपण्णा आतुर आहे. 

अमेरिकन ओपनला प्राधान्य
अमेरिकन टेनिस की इंडोनेशियातील आशियाई स्पर्धा, याविषयी निर्णय घ्यावा लागेल, असे सांगताना त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धेला प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले. आपल्याला त्या स्पर्धेत दोन हजार गुण राखायचे आहेत. त्यामुळे ते आवश्‍यक आहे, असे तो म्हणाला.

जिद्द बळावते - चिलीच
सरलेल्या मोसमाच्या प्रारंभी रॉजर फेडरर-रॅफेल नदाल यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली होती. त्या वेळी नव्या पिढीतील कोणते तारे चमकतात याची प्रतीक्षा होती, तर मधल्या पिढीतील मरिन चिलीच याच्यासारख्या खेळाडूंकडूनही अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात फेडरर-नदालने चार पैकी दोन-दोन ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे वाटून घेतली. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना कशी प्रेरणा मिळते, या प्रश्नावर चिलीच म्हणतो की, आमची जिद्द वाढते. आणखी कसून सराव करण्याची प्रेरणा मिळते. मी मागील मोसमापेक्षा सरस कामगिरीचे ध्येय ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news rohan bopanna tennis