ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रवास सर्वांत महत्त्वाचा - अंकिता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 January 2018

पुणे - खेळामध्ये कारकीर्द घडविताना हार आणि जीत हे ओघानेच येते. खेळात कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतल्यावर खेळाडूसाठी अंतिम ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रवास सर्वांत महत्त्वाचा असतो, असे मत पुण्याची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अंकिता रैना हिने व्यक्त केले.

पुणे - खेळामध्ये कारकीर्द घडविताना हार आणि जीत हे ओघानेच येते. खेळात कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतल्यावर खेळाडूसाठी अंतिम ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रवास सर्वांत महत्त्वाचा असतो, असे मत पुण्याची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अंकिता रैना हिने व्यक्त केले.

येथील संस्कृत विद्या मंदिराच्या क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉलच्या उद्‌घाटनासाठी ती आली होती. त्या वेळी टेबल टेनिसपटू सन्मय परांजपे हिने तिला बोलते केले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘खेळाडू विजेतेपदाचा आनंद साजरा करतो आणि ते अपेक्षितच असते. पण, हा आनंद तो विजेतेपदानंतर मैदानावर असेपर्यंत साजरा करू शकतो. त्याचा आनंद फार काळ घेऊ शकत नाही. त्याला लगेच दुसऱ्या स्पर्धेचे वेध लागलेले असतात. त्यामुळेच विजेतेपदाच्या आनंदापेक्षा विजेतेपदापर्यंत पोचण्यापर्यंत जो प्रवास त्या खेळाडूने केलेला असतो तो सर्वांत महत्त्वाचा असतो. तो प्रवासच त्या खेळाडूला खूप काही शिकवून जातो.’’

एखाद्या खेळात कारकीर्द घडविताना मेहनत आणि गुरूने दिलेल्या विद्येला महत्त्व देता आले पाहिजे, असेदेखील तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘आजकाल खेळाडूंपेक्षा पालकच पाल्याच्या यशा- अपयशाविषयी उतावीळ झालेले दिसतात. यश मिळाले की प्रशिक्षक चांगला, अपयश आले की प्रशिक्षक बदलण्याची त्यांना घाई असते. पण, हे चूक आहे. हिऱ्याला पैलू पाडल्यावरच तो आकर्षक दिसतो. तसेच खेळाडूचे आहे. खेळायला सुरवात केली की तो घडत नाही किंवा जिंकत नाही. त्याला घडवावे लागते. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि हेच काम प्रशिक्षक करत असतो. त्यामुळे सर्वप्रथम प्रशिक्षकावर विश्‍वास ठेवणे खूप आवश्‍यक आहे. हे विश्‍वासाचे नाते खूप महत्त्वाचे असते. ते जपून ठेवले, तर ते दृढ होते.’’

खेळात कारकीर्द घडविताना स्पर्धा आणि अभ्यास हातात हात घालून चालू शकत नाही. पण, खेळामुळे आपल्याला जी शिस्त लागते, त्यामुळे त्यावर मात करता येते. मी केली. तुम्हालाही ती करता येईल. त्यासाठी दोन्ही आघाड्यांवर मेहनत करायला हवी. मेहनतीशिवाय फळ मिळत नाही, असे सांगून शेवटी अंकिताने आपल्या कारकिर्दीत माझ्या खेळाला जेवढे महत्त्व आहे कदाचित त्यापेक्षा अधिक महत्त्व आईला आहे. तिने मला प्रोत्साहन दिले नसते तर आज मी तुमच्यासमोर उभीच राहू शकले नसते, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis Ankita Raina pune