व्हिक्‍टोरियाचा विजय

पीटीआय
Thursday, 6 July 2017

लंडन - बेलारूसची ‘सुपरमॉम’ व्हिक्‍टोरिया अझारेन्का हिने विंबल्डन टेनिस स्पर्धेतील आगेकूच कायम राखत तिसरी फेरी गाठली. तिने १५व्या मानांकित रशियाच्या अलेना व्हेस्नीना हिला ६-३, ६-३ असे हरविले.

लंडन - बेलारूसची ‘सुपरमॉम’ व्हिक्‍टोरिया अझारेन्का हिने विंबल्डन टेनिस स्पर्धेतील आगेकूच कायम राखत तिसरी फेरी गाठली. तिने १५व्या मानांकित रशियाच्या अलेना व्हेस्नीना हिला ६-३, ६-३ असे हरविले.

डिसेंबरमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर व्हिक्‍टोरियाची ही दुसरीच स्पर्धा आहे. टेनिसच्या इतिहासात केवळ तिघींनीच आई झाल्यानंतर ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. इव्हॉन गुलागाँग, मार्गारेट कोर्ट आणि किम क्लिस्टर्स यांनी ही कामगिरी केली आहे. व्हिक्‍टोरियाला पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. त्या वेळी तिने वेळापत्रक सोईचे नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. व्हेस्नीनाने गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे व्हिक्‍टोरियासाठी ही लढत सोपी नव्हती. व्हिक्‍टोरियासमोर ब्रिटनच्या हिदर वॉट्‌सनचे आव्हान असेल. हिदरने १८व्या मानांकित  अनास्ताशिया सेवास्तोवा (लॅट्विया) हीला ६-०, ६-४ असे हरविले.

वॉझ्नीयाकीची झुंज
डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीने हंगेरीच्या टिमीया बॅबोसला चुरशीच्या लढतीत ६-४, ४-६, ६-१ असे हरविले. कॅरोलीनला पाचवे मानांकन आहे, तर टिमीया ४२व्या स्थानावर आहे. ‘मी प्रत्येक गुणासाठी संघर्ष केला. दोन्ही सेटमध्ये मी पिछाडीवर होते, पण मी फटक्‍यांमध्ये सुधारणा केली,’ असे वॉझ्नीयाकीने सांगितले. पहिले दोन सेट अटीतटीचे झाल्यानंतर वॉझ्नीयाकीने निर्णायक सेटमध्ये खेळ उंचावला. टिमीयाच्या सदोष खेळामुळे हा सेट एकतर्फी झाला. वॉझ्नीयाकीला यंदा चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. विंबल्डनमध्ये तिला एकदाही उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही.

कुझ्नेत्सोवाची आगेकूच
सातव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने ऑन्स जॅबेयूरला ६-३, ६-२ असे हरविले. ट्युनिशियाच्या ऑन्सने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Wimbledon 2017