esakal | जोकोविच, फेडररची आगेकूच 
sakal

बोलून बातमी शोधा

जोकोविच, फेडररची आगेकूच 

मिश्र दुहेरीत भारतीयांची आगेकूच
मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा, पूरव राजा यांनी आपले आव्हान राखले. सानिया मिर्झाने क्रोएशियाच्या इव्हान डोडिंगच्या साथीत जपानच्या युसुके वातानुकी आणि मकोतो निमोमिया जोडीचा ७-६, ६-२ असा पराभव केला. ही लढत एक तास १८ मिनिटे चालली. त्यानंतर पूरव राजाने जपानच्या एरि होजुमी याच्या साथीत जेम्स कारेटानी (अमेरिका) आइण रेनाटा वोराकावा (चेक प्रजासत्ताक) जोडीचा एक तास ४५ मिनिटांच्या लढतीनंतर ६-३, ३-६, ६-४ असा पराभव केला.

जोकोविच, फेडररची आगेकूच 

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - विंबल्डन टेनिसमधील सर्वांत अनुभवी रॉजर फेडरर याने आपली आगेकूच कायम राखत अखेरच्या सोळा जणांत सहज स्थान मिळविले. सेंटर कोर्टवर झालेल्या लढतीत त्याने जर्मनीच्या मिशा झ्वेरेव याचा ७-६(७-३), ६-४, ६-४ असा पराभव केला. 

फेडररने कारकिर्दीत पंधराव्यांदा विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. आता त्याची गाठ बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रावशी पडणार आहे. 

फेडररपाठोपाठ नोव्हाक जोकोविच यानेही आपली आगेकूच कायम राखली. त्याने लॅटवियाच्या अर्नेस्ट गुल्बिसचा ६-४, ६-१, ७-६(७-२) असा पराभव केला. जोकोविच याने तिसऱ्या गेमला सर्व्हिस गमावली. गुल्बिसने त्यावेळी तीन जोरकस फटके मारले. पण, त्या वेळी जोकोविच पंचांच्या निर्णयावर समाधानी नव्हता. चिडलेल्या जोकोविच याने त्या वेळी पंचांना उद्देशून ‘फोकस’ (लक्ष द्या) असा शब्द ही उच्चारला. पण, त्यानंतर लगेच त्याने माफी देखील मागितली. जोकोविच म्हणाला, ‘‘असे बोलण्याची माझी ती योग्य वेळ नव्हती. त्यामुळेच मी त्यांची माफी मागितली. ते आपल्या परीने आपले काम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतात. कधी कधी त्यांच्याकडून चूक होऊ शकते.’’

गाउंड्‌समनकडून पाठराखण
विंबल्डनच्या कोर्टबाबत अनेक खेळाडूंनी नाराजीचा सूर काढला असला, तरी विंबल्डनचे मुख्य ग्राऊंड्‌समन निल स्टबले यांनी कोर्ट योग्य असल्याचे सांगून तेथील परिस्थितीची पाठराखण केली आहे. ते म्हणाले,‘‘आम्ही खेळाडूंची मते जाणून घेत असतो. आमच्यासाठी ते महत्त्वाचे असते. गेल्यावर्षी जशी स्थिती होती, तशीच या ही वेळी आहे. त्यात कसलाच फरक पडलेला नाही. त्यामुळेच या वेळी खेळाडू टिका का करत आहेत हेच कळत नाही. कडक ऊनाचा जरूर परिणाम होत असला, तरी आम्ही त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करत आहोत. येथील हिरवळ कशी जपायची याची देखील काळजी घेत आहोत.’’