ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना सेरेना होती गर्भवती !

वृत्तसंस्था
Thursday, 20 April 2017

सेरेनाने दिलेल्या 20 आठवड्यांच्या माहितीनुसार ऑस्टेलियन ओपनचे जेतेपद मिळविताना ती सुमारे 2 महिन्यांची गर्भवती होती, असेही निष्पन्न झाले आहे

न्यूयॉर्क - गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविणारी अमेरिकेची प्रतिथयश टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही त्यावेळी गर्भवती होती, असे स्पष्ट झाले आहे. जागतिक क्रमवारीत लवकरच पुन्हा एकदा अग्रक्रमाकडे झेपावणाऱ्या सेरेनाचे हे तब्बल 23 वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद होते. सेरेना गर्भवती असल्याने 2017 मधील पुढील स्पर्धांमध्ये ती खेळणार नसल्याची माहिती तिच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

खुद्द सेरेनाने ती गर्भवती असल्याची माहिती एका "सेल्फी'द्वारे दिली होती. तिने "स्नॅपचॅट'वर एका पिवळ्या स्विमसुटमधील छायाचित्र अपलोड करत त्याबरोबर "20 आठवडे' इतकीच त्रोटक माहिती दिली होती! मात्र हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर सेरेनाने ते लगेचच काढून टाकले. यामुळे माध्यमे, तिचे चाहते व एकंदरच टेनिस विश्‍वामध्ये खळबळ उडाली होती. सेरेनाचे ते छायाचित्र विनोद होता अथवा नाही, यासंदर्भातील चर्चा व तर्कांना उधाण आले असतानाच ती निश्‍चितपणे गर्भवती असल्याची माहिती लॉस एंजेलिसमधील "पब्लिसिस्ट' केली बुश नोव्हाक यांनी दिली.

सेरेना पुढील वर्षी खेळणार असल्याचेही नोव्हाक यांनी स्पष्ट केले आहे. सेरेनाने दिलेल्या 20 आठवड्यांच्या माहितीनुसार ऑस्टेलियन ओपनचे जेतेपद मिळविताना ती सुमारे 2 महिन्यांची गर्भवती होती, असेही निष्पन्न झाले आहे.

सेरेनाने गेल्या डिसेंबर महिन्यात रेडिट कंपनीचे सहसंस्थापक ऍलेक्‍सिस ओहानिअन यांच्याबरोबर वाड:निश्‍चय झाल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सेरेना गर्भवती असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर तिच्यावर आता सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tennis superstar Serena Williams confirms pregnancy