esakal | फ्रेंच टेनिस पात्रता स्पर्धेत युकी, रामकुमारचा पराभव

बोलून बातमी शोधा

फ्रेंच टेनिस पात्रता स्पर्धेत युकी, रामकुमारचा पराभव
फ्रेंच टेनिस पात्रता स्पर्धेत युकी, रामकुमारचा पराभव
sakal_logo
By
पीटीआय

पॅरिस - भारताच्या डेव्हिस करंडक संघातील युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना फ्रेंच ओपनच्या पात्रता स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. युकीला कॅनडाच्या पीटर पोलॅन्स्कीने ७-६ (७-५), ७-६ (७-५) असे हरविले. जागतिक क्रमवारीत युकीचा २४१वा, तर पीटरचा १३२वा क्रमांक आहे. पीटरला २५वे मानांकन होते. रामकुमारचा अर्जेंटिनाच्या गुईडो पेल्ला याच्याकडून २-६, १-६ असा पराभव झाला. रामकुमार २६५व्या, तर गुईडो ११४व्या क्रमांकावर आहे. गुईडो क्‍ले कोर्ट स्पेशालिस्ट आहे.

पूर्वी तो जागतिक क्रमवारीत ३९व्या क्रमांकापर्यंत पोचला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध रामकुमारला फारशी संधी मिळाली नाही. युकीने चांगली झुंज दिली. सुरवातीलाच ब्रेक नोंदवीत त्याने ३-० अशी आघाडी घेतली होती. पीटरने ४-४ अशी बरोबरी साधली. हा सेट टायब्रेकमध्ये गेला. त्यात २-५ पिछाडीवरून युकीने ५-५ अशी बरोबरी साधली; पण पीटरने सलग दोन गुण जिंकले. दुसऱ्या सेटमध्ये युकीने सातव्या गेममध्ये सर्व्हिस गमावली; पण त्याने लगेच या ब्रेकची भरपाई करत ४-४ अशी बरोबरी साधली. हा सेटही टायब्रेकमध्ये गेला. त्यात पीटरने ६-३ आघाडीसह तीन मॅचपॉइंट मिळविले. युकीने त्यातील दोन वाचविले, पण त्याची झुंज अपुरी पडली. युकी आणि रामकुमार यांच्या पराभवामुळे या वेळी पुरुष एकेरीत भारताचा एकही खेळाडू मुख्य स्पर्धेत नसेल. फ्रेंच ओपनला २८ मेपासून प्रारंभ होत आहे.