esakal | INDvsWI : विराट सेनेचा विंडीजला व्हाईटवॉश
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

संक्षिप्त धावफलक
भारत : ४१६ व ४ बाद १६८  घोषित (रहाणे नाबाद ६४, विहारी नाबाद ५३, रोच ३-२८) वि. वेस्ट इंडीज ११७ व ५९.५ षटकांत सर्वबाद २१० (कॅम्पबेल १६, ब्राव्हो रिटायर्ड हर्ट २३, शॅमार्ह ब्रुक्‍स ५०, रॉस्टन चेस १२, ब्लॅकवूड ३८, जेसन होल्डर ३९, इशांत १२-३-३७-२, बुमरा ११-४-३१-१, शमी १६-२-६५-३, जडेजा १९.५-४-५८-३).

INDvsWI : विराट सेनेचा विंडीजला व्हाईटवॉश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

किंग्स्टन (जमैका) : भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी विंडीजला २५७ धावांनी हरविले. ४६८ धावांच्या आव्हानासमोर विंडीजचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताचे सलग दुसऱ्या विजयासह १२० गुण झाले.  मालिकेतील २-० अशा धवल यशासह भारताने जागतिक कसोटी मालिकेत निर्विवाद आघाडी घेतली.

दोन विकेट गमावीत विंडीजने पहिल्या सत्रात शतकी भर घातली, पण त्यामुळे निर्माण झालेल्या अंधूक आशा अखेर फोल ठरल्या. आज डॅरेन ब्राव्होला डोके गरगरल्यामुळे मैदान सोडावे लागले. काल त्याला बुमराचा चेंडू लागला होता. त्याऐवजी नव्या नियमानुसार (कॉन्कशन सबस्टिट्यूट) जर्मेन ब्लॅकवूड फलंदाजीस आला.

४६८ धावांच्या आव्हानासमोर विंडीजने काल २ बाद ४५ धावा केल्या होत्या. ब्राव्हो १८, तर ब्रुक्‍स २३ धावांवर नाबाद होते. ब्राव्होला २ बाद ५५ अशा स्थितीस १७व्या षटकात मैदान सोडावे लागले. तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात बुमराचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला होता. त्या वेळी हेल्मेटचे मानेवरील आवरण (स्टेम गार्ड) तुटून पडले होते. त्यानंतर तो दोन चेंडू खेळला. मेंदूपाशी इजा झाली आहे का, याची चाचणी झाली होती. त्यात तसा मार लागल्याचे निदान झाले. मात्र, ब्राव्हो आज मैदानावर उतरला. तो आणखी दहा चेंडू खेळला. त्याने दिवसातील चौथ्या षटकात बुमराला पहिल्याच चेंडूवर कव्हरला चौकार मारला. पण, त्यानंतर त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. मग रॉस्टन चेस मैदानावर उतरला. दरम्यान, विंडीज संघ व्यवस्थापनाने नव्या नियमानुसार बदली खेळाडूसाठी विनंती केली, जी सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी मंजूर केली. जडेजाने चेसला, तर इशांतने हेटमायरला बाद केले. त्यानंतर ब्लॅकवूड फलंदाजीला आला. 

त्यापूर्वी, विंडीजला फॉलोऑन न देता भारताने दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला. या वेळी मात्र भारतीय फलंदाज केमार रोचसमोर निष्प्रभ ठरले. तरी आघाडी वाढविण्यात भारताला यश आले. यात अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारी यांची फलंदाजी निर्णायक ठरली. 

विंडीजची सुरवात बरी झाली. क्रेग ब्रेथवेट इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक पंतकडे झेल देऊन बाद झाला. दुसरीकडे कॅम्पबेलने स्लिपमध्ये विहारीकडून मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शमीचा स्वैर चेंडू मारण्याची घाई त्याला महागात पडली.

संक्षिप्त धावफलक
भारत : ४१६ व ४ बाद १६८  घोषित (रहाणे नाबाद ६४, विहारी नाबाद ५३, रोच ३-२८) वि. वेस्ट इंडीज ११७ व ५९.५ षटकांत सर्वबाद २१० (कॅम्पबेल १६, ब्राव्हो रिटायर्ड हर्ट २३, शॅमार्ह ब्रुक्‍स ५०, रॉस्टन चेस १२, ब्लॅकवूड ३८, जेसन होल्डर ३९, इशांत १२-३-३७-२, बुमरा ११-४-३१-१, शमी १६-२-६५-३, जडेजा १९.५-४-५८-३).

loading image
go to top