
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी मंगळवारी अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार ठोकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेची यशस्वी सांगता केली. हिर शहा, सानवी देशवाल यांनी आपापल्या गटात रौप्यपदक जिंकले. ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर ४ बाय १०० मिटर मिश्र मिडले रीलेतही महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.
पुरुषांच्या १०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या हिर शहा याने ५१.६१ सेकंद वेळेसह रौप्य, तर ऋषभ दासने ५१.७१ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने ५०.६५ सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. या प्रकारातील महिला गटातही कर्नाटकच्या धीनिधी देसिंधू हिने ५७.३४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने ५९.४९ सेकंद वेळेसह कांस्य, तर दिल्लीच्या तीतिक्षा रावत हिने ५९.३८ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले.