
Maharashtra Wrestlers Won 1 Gold, 2 Silver and 6 Bronze Medals: कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानाने लागले.
रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या यशाचा जल्लोष शेवटच्या दिवशीही घुमला. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने मध्य प्रदेशच्या पुजा जाटला 5-1 गुणांनी नमवून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी कुस्तीतील एकमेव सुवर्णयश संपादन केले. उपांत्य फेरीत कुस्तीला 25 सेकंद बाकी असताना दंगल चित्रपटाची आठवण करून देणारा 4 गुणांचा साईट थ्रो मारून स्वातीने हरियाणाच्या ज्योतीला नमवून कुस्तीशौकिनांची मने जिंकली होती.