58th Senior National Kho-Kho Championship
esakal
काझीपेठ (तेलंगणा) : काझीपेठ येथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या महास्पर्धेत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी महिलांच्या गटात अजिंक्यपदाचा झेंडा फडकावला, तर रेल्वेच्या शिलेदारांनी पुरुष गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाला नमवले, तर पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वेने महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत धाराशिव, महाराष्ट्राच्या संध्या सुरवसेला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, तर रेल्वेच्या रामजी कश्यपला (सोलापूर) एकलव्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांमध्ये महाराष्ट्राचे हे २७ वे, तर पुरुषांमध्ये रेल्वेचे १३ वे अजिंक्यपद ठरले.