अहमदाबादमध्ये दोन खेळपट्ट्या तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmedabad Cricket Stadium

मालिकेतील तिन्ही सामने तीन दिवसांच्या आत संपले. इंदूर कसोटीत तर फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाची फजिती झाली.

Ahmedabad Cricket Stadium : अहमदाबादमध्ये दोन खेळपट्ट्या तयार

अहमदाबाद - इंदूर येथील कसोटी सामन्यात झालेला भारताचा पराभव, तेथील खेळपट्टीवर आयसीसीने मारलेला ‘सुमार’ असा शेरा, जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याचे आव्हान अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी कशी असणार, या चर्चेने जोर धरला असतानाच क्युरेटर्सनी दोन खेळपट्ट्या तयार करून ठेवल्या आहेत, या वृत्ताने अधिक उत्कंठा वाढवली आहे.

मालिकेतील हे तिन्ही सामने तीन दिवसांच्या आत संपले. इंदूर कसोटीत तर फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाची फजिती झाली. त्यामुळे आता अहमदाबाद येथील सामन्यासाठी खेळपट्टी कशी असणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. हा सामना गुरुवारपासून सुरू होत असताना अजूनही कोणती खेळपट्टी असणार आणि तिचे स्वरूप कसे असणार, याबाबत संभ्रम आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यासाठी अहमदाबाद हे होम ग्राऊंड आहे. पहिले तिन्ही सामने तीन दिवसांच्या आत संपलेले असल्यामुळे हा चौथा सामना पाच दिवस चालावा, यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी पहिल्या दिवसापासून फिरकीस साथ देईल, अशी खेळपट्टी तयार करण्याचा धोका स्वीकारला जाणार नाही. शिवाय इंदूर खेळपट्टीवर सुमार असा शेरा दिलेला असल्यामुळे जय शहा अहमदाबाद खेळपट्टीवर असा कोणताही शेरा येणार नाही, याची काळजी घेतील.

सोमवारी जोरदार पावसाची हजेरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ अहमदाबादला दाखल झाले आणि सोमवारी संध्याकाळी मार्च महिन्याच्या मध्याला अहमदाबादला जोरदार पाऊस कोसळला. इंदूरसारखी अहमदाबादची खेळपट्टीबाहेरचे मैदान कोरडे ठणठणीत राहू नये म्हणू जणू काही निसर्गानेच काळजी घेतली, संयोजक पावसाकडे बघत गंमतीने म्हणत होते. भारतातल्या कोणत्याही मैदानापेक्षा अहमदाबादचे मैदान फारच सुंदर निगा राखलेले आहे. बाहेरील मैदानाच्या हिरवळीवर अभय पाटणकर ही व्यक्ती गेली तीन वर्षे मेहनत घेत असल्याचा चांगला परिणाम जाणवत आहे. आऊट फिल्डवर असलेल्या गवताचा आणि खेळपट्टीचा संबंध नाही.

फलंदाजांसाठी आव्हान जास्त - द्रविड

खेळपट्टीवरून सतत चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच असते, असे स्पष्ट मत भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चौथ्या कसोटी सामन्याच्या सरावापूर्वी व्यक्त केले.

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात दाखल होण्याची चुरस सगळ्याच संघांच्या मनात असल्याने कसोटी सामने निकाली व्हावेत म्हणून जरा जास्त प्रयत्न होत आहेत. फलंदाजांसाठी आव्हान जास्त आहे हे नाकारून चालणार नाही असे द्रविड म्हणाले.

भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या खेळपट्ट्या बदलल्या आहेत. याच कारणाचा विचार करता आता खूप मोठ्या खेळी होताना अभावाने दिसत आहेत.

गेल्या तीन सामन्यांतील खेळाचा विचार करता कोणी ६०-७० धावांची खेळी केली तरी ती मोलाची ठरू शकते. गेल्या सामन्यात पहिल्या डावात आम्ही कमी धावा केल्या. जर अजून ७० ते ८० धावा वाढवता आल्या असत्या किंवा त्यांना पहिल्या डावात ५० धावा कमी करून दिल्या असत्या तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळाले असते, असे मत द्रविड यांनी मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी समालोचन करणार?

नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस खूप आगळावेगळा असण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस सामन्याअगोदर खेळाडूंना भेटणार आहेत. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेणार आहेत.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानेस काही काळ सामन्याचे समालोचन करतील असे सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदीही हिंदी समालोचन करताना ऐकायला मिळतील. अखेर हे नक्की घडणार का, हे सामन्याच्या आदल्या दिवशी अधिकृतरीत्या समजणार आहे.

टॅग्स :Crickettest cricket