दारूच्या नशेत महिला खेळाडूंवर विनयभंग अन् मारहाण! भारतीय फुटबॉल महासंघाचा 'तो' पदाधिकारी निलंबित

 Deepak Sharma
Aiff Suspends Deepak Sharma News Marathi sakal

Aiff Suspends Deepak Sharma : गोव्यातील म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या इंडियन वुमेन लीग २ (आयडब्ल्यूएल) फुटबॉल स्पर्धेतील कालावधीत महिला खेळाडू विनयभंग व मारहाणप्रकरणी अटक झालेले अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा यांना सर्व प्रकारच्या फुटबॉलसंबंधित उपक्रमातून निलंबित करण्यात आले.

यासंदर्भात एआयएफएफची तातडीची बैठक सोमवारी (ता. १) नवी दिल्ली येथे मुख्यालयात झाली. बैठकीस महासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार उपस्थित होते. त्यानंतर रात्री एआयएफएफ सदस्य संघटनांची बैठक झाली. मंगळवारी दुपारी महासंघाच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक घेण्याचे ठरले.

दीपक शर्माप्रकरणी मंगळवारी (ता. २) कार्यकारी समितीने सविस्तर चर्चा केली. या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी ३० मार्च रोजी नियुक्त करण्यात आलेली पिंकी बोमपाल मगर यांच्या अध्यक्षतेखालील अस्थायी समिती बरखास्त करण्याचा आणि प्रकरण तातडीने एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे सोपवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

एआयएफएफच्या तातडीच्या बैठकीत सोमवारी दीपक शर्मा यांच्याविरोधात आलेल्या संबंधित महिला खेळाडूंच्या तक्रारीवर चर्चा झाली. आपली बाजू मांडण्यासाठी दीपक शर्मा यांना पाचारण करण्यात आले होते, त्यांचे म्हणणे काही मिनिटे ऐकून घेतल्यानंतर बैठकीतून निघण्यास बजावण्यात आले. एआयएफएफ कार्यकारी समितीतील बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावानुसार, पुढील आदेशापर्यंत दीपक शर्मा सर्व प्रकारचा फुटबॉलसंबंधित उपक्रमातून निलंबित असेल आणि भाग घेऊ शकणार नाही.

महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर अटक

महिला फुटबॉल खेळाडूचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गेल्या शनिवारी (ता. ३० मार्च) एआयएफएफ कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल अकादमी या क्लबची २१ वर्षीय महिला खेळाडू तक्रारादर आहे.

तक्रारदारानुसार, सदर कृत्य केले तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होता. हा विनयभंग तथा मारहाणीचा प्रकार पेडे-म्हापसा येथील एका व्हिलामध्ये घडला. फिर्यादी ही हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल अकादमी संघाची खेळाडू असून संशयित दीपक शर्मा याच संघाचे अधिकारीही आहेत.

आयडब्ल्यूएल २ स्पर्धेत खाड एफसीचा क गटात समावेश होता. दीपक शर्मा हिमाचल प्रदेश फुटबॉल संघटनेचे सचिव व एआयएफएफ स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आहेत. रविवारी (ता. ३१ मार्च) दीपक यांना न्यायालयाने २० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि तितक्याच रकमेच्या दोन स्थानिक हमीदारांवर जामीन मंजूर केला होता.

`महिला फुटबॉलला सुरक्षित आणि सक्षम वातावरणात प्रोत्साहन देण्यासाठी एआयएफएफ कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील. गोव्यातील आयडब्ल्यू २ स्पर्धेदरम्यान घडलेली घटना एआयएफएफच्या महिला फुटबॉलमधील विकासात्मक प्रयत्नांना हानी पोहोचवण्यासाठी वाढू देता कामा नये. हे प्रकरण आता शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले असून त्याची तातडीने दखल घेतली जाईल.`

- कल्याण चौबे, अध्यक्ष, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com