भारतीय संघात स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्न

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भारतीय क्रिकेट संघातील स्थान सातत्यपूर्ण धावा करून पक्के करण्याचा माझा प्रयत्न आहे. चांगली कामगिरी करतानाच संघाच्या यशात मोलाचा वाटा असावा, असेही लक्ष्य असेल असे श्रेयस अय्यरने सांगितले.

पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय क्रिकेट संघातील स्थान सातत्यपूर्ण धावा करून पक्के करण्याचा माझा प्रयत्न आहे. चांगली कामगिरी करतानाच संघाच्या यशात मोलाचा वाटा असावा, असेही लक्ष्य असेल असे श्रेयस अय्यरने सांगितले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाचव्या क्रमांकावर खेळावयास आलेल्या श्रेयस अय्यरने विराट कोहलीस चांगली साथ दिली. त्यांच्या सव्वाशतकी भागीदारीमुळे भारताने पावणेतीनशेची मजल मारली. श्रेयसने धावांचा वेग चांगला राखल्याने आपल्यावरील दडपण कमी झाले असे विराट कोहलीने सांगितले.

भारताच्या अ संघातून वेस्ट इंडिजमध्ये यापूर्वी खेळल्याचा श्रेयसला फायदा झाला.
आज चांगली कामगिरी झाली. माझी कामगिरी चांगली होईल हा विश्‍वास होता. भारत अ संघाकडून याच स्टेडियमवर खेळलो होतो. त्यामुळे खेळाचे चांगले नियोजन करता आले, असे त्याने सांगितले.

या सामन्यात मी कोणताही धोका पत्करणार नाही असे ठरवले होते. विराटने मला आता मोठ्या भागीदारीची गरज आहे, त्याचबरोबर डावाच्या अंतिम षटकापर्यंत मैदानात असण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. त्याने मला सतत प्रोत्साहन दिले. आम्ही एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. त्याचवेळी चौकाराची संधीही सोडली नाही. या खेळपट्टीवर अडीचशे धावा पुरेशा होतील, असे आम्हाला वाटले होते. त्यापेक्षा 30 धावा जास्त झाल्या. किमान 45 षटकांपर्यंत खेळण्याची त्याने मला सूचना दिली होती, असेही श्रेयस म्हणाला.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aim to fix the place in indian team