सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्याची भारताची सूचना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पाकिस्तानातील डेव्हिस कप लढतीच्या सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्यात यावा, हा आढावा दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी घेण्यात आला होता, अशी सूचना भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास केली आहे. त्याच वेळी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास आम्ही तयार आहोत, असेही सांगितले आहे.

मुंबई : पाकिस्तानातील डेव्हिस कप लढतीच्या सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्यात यावा, हा आढावा दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी घेण्यात आला होता, अशी सूचना भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास केली आहे. त्याच वेळी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास आम्ही तयार आहोत, असेही सांगितले आहे.

भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी नव्या परिस्थितीतील भारतीय संघाच्या लढत खेळण्याबाबतचा पूर्ण निर्णय आपल्या सूचनेवर अवलंबून असेल, असे सांगत सर्व काही आंतरराष्ट्रीय महासंघाच्या गळी उतरवले आहे.

भारत सरकारने आम्हाला ऑलिंपिक नियमावलीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. मात्र त्याच वेळी आम्ही सरकार; तसेच खेळाडूंना लढतीच्या सुरळीत; तसेच सुरक्षित संयोजनाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने घेतली असल्याचे सांगितले आहे. दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी आपण पाकिस्तानातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने आता बदलत्या परिस्थितीत सुरक्षेचा पुन्हा आढावा घेणे योग्य होईल, ज्याद्वारे आपलीही तेथील परिस्थितीबाबत खात्री होईल. त्याचबरोबर या लढतीतील संबंधितांना त्याची ग्वाही मिळेल, असे चॅटर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.

इस्लामाबादमध्ये खेळणे सुरक्षित असल्याचे कळवताना आपण खेळाडूंची सुरक्षा आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे, असे सांगितले होते, याचीही आठवण चॅटर्जी यांनी करून दिली आहे. त्याचबरोबर आपण सुरक्षेचा अहवाल दिल्यावर आम्ही त्या दृष्टीने व्हिसासाठी अर्ज करू. आता जर पाकिस्तानात खेळणे सुरक्षित नाही, असे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे मत झाले तर आपण त्या संदर्भात सूचना करावी. आम्ही आंतरराष्ट्रीय महासंघाच्या सूचनांचे पालन करू, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AITA asked ITF to review security in Pakistan