मितभाषी अजिंक्‍य रहाणेनेही फुंकले रणशिंग

मुकुंद पोतदार - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

गहुंजे - प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असल्यावर प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज होतो. संघात नसलेल्या हरभजन सिंग याने सुद्धा कांगारूंचा सध्याचा संघ आतापर्यंतचा सर्वाधिक कमकुवत असल्याचे जोरदार वक्तव्य केले होते. आता मितभाषी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाच्या अजिंक्‍य रहाणे यानेही तोफ डागली. कांगारू स्लेजिंग करतील की नाही, याची कल्पना नसली तरी त्यांच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध प्लॅन असल्याचे सांगत रहाणेने रणशिंग फुंकले.

गहुंजे - प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असल्यावर प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज होतो. संघात नसलेल्या हरभजन सिंग याने सुद्धा कांगारूंचा सध्याचा संघ आतापर्यंतचा सर्वाधिक कमकुवत असल्याचे जोरदार वक्तव्य केले होते. आता मितभाषी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाच्या अजिंक्‍य रहाणे यानेही तोफ डागली. कांगारू स्लेजिंग करतील की नाही, याची कल्पना नसली तरी त्यांच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध प्लॅन असल्याचे सांगत रहाणेने रणशिंग फुंकले.

सरावानंतर पत्रकारांशी रहाणेने संवाद साधला. ऑस्ट्रेलियन संघ माईंड गेम खेळण्यात तरबेज आहे. मैदानावर त्यांना काहीही करू देत. आम्ही आमचा प्लॅन उघड करणार नाही, पण कौशल्य किंवा स्लेजिंग अशा दोन्ही पातळ्यांवर मोर्चेबांधणी केल्याचे रहाणेने सांगितले.

कर्णधार विराटचा आभारी
रहाणेला दुखापतीमुळे सुमारे दोन महिने ब्रेक घ्यावा लागला. त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या करुण नायरने त्रिशतकी खेळी केली. यानंतरही रहाणे तंदुरुस्त होताच त्याला संघातील स्थान मिळाले. पर्यायी खेळाडूने लक्षवेधी कामगिरी केली तरी आधीच्याच खेळाडूचे स्थान कायम राहील, असे कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी सांगितले होते. त्यानुसार रहाणेला संधी मिळाली आणि त्याने ८२ धावांची खेळी केली. या संदर्भातील प्रश्नावर रहाणेने विराटचे आभार मानले. तो म्हणाला, की ही खेळी माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. मी कसोटीसाठी उत्सुक होतो. मी खेळपट्टीवर जेवढा वेळ होतो त्या वेळी मला खेळताना फार छान वाटले. अर्थात या कसोटीसाठी नव्याने सुरवात करावी लागेल. ऑस्ट्रेलियन संघ चांगला व अनुभवी असल्याचे प्रत्येकाला माहीत आहे. आम्हाला आमच्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल आणि एकमेकांना पाठिंबा द्यावा लागेल. एका वेळी एका सामन्याचा विचार करून पहिल्या लढतीपासून सातत्य ठेवावे लागेल.

करुणची खेळी देशासाठी
करुणविषयी रहाणेने वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करीत संघभावना प्रदर्शित केली. तो म्हणाला, की दुखापती खेळाचा अविभाज्य भाग असतात. करुणने देशासाठी तीनशे धावा केल्या. अखेरीस आम्ही सारे देशाचे प्रतिनिधित्व करीत असतो. संघव्यवस्थापन माझ्या पाठीशी उभे राहिले. मी या मालिकेसाठी आतुर आहे.

आपल्या डावपेचांवर लक्ष
ऑस्ट्रेलियाकडे तीन वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत पाच फिरकी गोलंदाज आहेत. त्यांना फिरकीस अनुकूल खेळपट्ट्यांची आशा आहे; पण भारताने त्यांच्या गोलंदाजीचा विचार न करता आपल्या डावपेचांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

मानसिक पातळीवर बदल
वेगवेगळ्या प्रकारात खेळण्याविषयी तो म्हणाला, की तांत्रिक नव्हे तर मानसिक पातळीवरच तुम्हाला जुळवून घ्यावे लागले. वेगवेगळ्या खेळपट्ट्या आणि परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे हे शिकावे लागते. फलंदाजासाठी ते महत्त्वाचे असते.

आम्ही नक्कीच आक्रमक खेळ करू. केवळ फिरकीच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक गोलंदाजांविरुद्ध वर्चस्वासाठी प्रयत्नशील राहू. सराव सामन्यात श्रेयस अय्यरने भक्कम खेळी केल्याची कल्पना आहे. त्याच्याशी माझे काही बोलणे झाले नाही. सराव सामना आणि कसोटीत फार मोठा फरक आहे. आम्हाला परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार खेळावे लागेल.
- अजिंक्‍य रहाणे.

पहिल्या दिवसानंतर खेळपट्टीचा अंदाज
खेळपट्टीविषयी त्याने सांगितले, की इंग्लंडविरुद्ध वन-डे सामन्याच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असेल. तेव्हा वन-डेसाठी फार चांगली खेळपट्टी होती. आता पहिल्या दिवसानंतरच खेळपट्टीचा अंदाज येईल.

Web Title: ajinkya-rahane interview