
Mumbai Kabaddi: डॉ. शिरोडकर स्पोर्टस् आणि विजय क्लब यांनी अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या अनुक्रमे महिला आणि किशोर गटाचे जेतेपद पटकावले. डॉ. शिरोडकर स्पोर्टस् ची मेघा कदम महिलांत, तर न्यू परशुराम मंडळाचा समर्थ कासूरडे किशोर गटात सर्वोत्तम खेळाडू ठरले. मेघा कदम हिला रोख रू. तीन हजार (₹३,०००/-), तर समर्थला रोख रू. दोन हजार(₹२,०००/-) तसेच प्रत्येकी बॅग व स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले. दादर, पोर्तुगीज चर्च येथील मंडळाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात डॉ. शिरोडकर स्पोर्टस् ने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवशक्ती महिला मंडळाला ३५-३४ असे चकवत अमरहिंद चषक व रोख रू.दहा हजार(₹१०,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिवशक्तीला रोख रू. पाच हजार(₹५,०००/-) चषकावर समाधान मानावे लागले.