
Shahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद
Shahid Afridi Virat Kohli Retirement : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला निवृत्ती घेण्याचा अजब सल्ला दिला होता. आफ्रिदी म्हणाला होता की विराट कोहलीने कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घ्यायला हवी. यावर भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने शाहिद आफ्रिदीवर टीका केली आहे. अमित मिश्राने (Amit Mishra) ट्विट करून आफ्रिदीला या विषयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
शाहिद आफ्रिदीने भारताचा रन मशिन विराट कोहलीला योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा आग्रह केला आहे. आफ्रिदी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, 'तुम्ही अशा स्तरावर पोहचू नये जिथे तुम्हाला संघातून वगळण्याची वेळ येईल. याशिवाय ज्यावेळी तुम्ही कारकिर्दिच्या सर्वोच्च शिखरावर असता त्यावेळी निवृत्तीची घोषणा केली पाहिजे. मात्र असे फार कमी वेळा होते. विशेषकरून आशियाई देशातील खूप कमी खेळाडू असा निर्णय घेतात. मला असे वाटते की विराट कोहलीला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल त्यावेळी तो चांगल्या प्रकारे निवृत्ती घेईल. ज्या प्रकारे त्याने आपल्या कारकिर्दिची सुरूवात केली होती. त्याचप्रकारे तो आपल्या कारकिर्दिची सांगता देखील करेल.'
शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यावर भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने आपली प्रतिक्रिया दिली. ट्विट करत अमित मिश्रा म्हणाला की, 'प्रिय आफ्रिदी, काही खेळाडू हे एकदाच निवृत्ती घेतात त्यामुळे कृपा करून विराट कोहलीला या सर्व गोष्टींपासून दूर राहू दे.' अमित मिश्राने असे ट्विट करून शाहिद आफ्रिदीला एक प्रकारे चिमटाच काढला आहे. काही वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीने तब्बल पाचवेळा निवृत्ती जाहीर केली होती. त्यातील चार वेळा तो निवृत्तीतून बाहेर आला होता.