अमोल मुझुमदार आफ्रिकेचे मार्गदर्शक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची दक्षिण आफ्रिका संघाचे अंतरिम फलंदाज मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबतची घोषणा केली.

मुंबई : मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची दक्षिण आफ्रिका संघाचे अंतरिम फलंदाज मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबतची घोषणा केली.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 11 हजार 167 धावा केलेले अमोल 2014 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक संघांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी यापूर्वी 19 तसेच 23 वर्षांखालील भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे, तसेच राजस्थान रॉयल्सचेही फलंदाज मार्गदर्शक होते. हेच काम त्यांनी नेदरलॅंडस्‌ संघासाठीही केले आहे. भारतीय क्रिकेट मंडळ, तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हाय परफॉर्मन्स कोचिंग सर्टिफिकीट त्यांनी मिळवले आहे.

अमोल आमच्यासाठी योग्य आहेत. त्यांना भारतीय खेळपट्ट्यांची पूर्ण जाणीव आहे, तसेच दक्षिण आफ्रिका फलंदाजांना कोणत्या आव्हानास सामोरे जावे लागेल, याचीही त्यांना पूर्ण कल्पना आहे. आमच्या फिरकी गोलंदाजांचे नुकतेच भारतात शिबिर झाले. त्यावेळीही त्यांनी साह्य केले होते. त्यावेळी त्यांचे आमच्या मार्गदर्शकांबरोबर सूर चांगले जुळले होते, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी क्रिकेट संचालक कॉरी व्हॅन झिल यांनी सांगितले.

क्रिकेटसाठी काम करण्यास मी कायम तयार असतो. 25 वर्षे मी क्रिकेट खेळलो आहे आणि त्यानंतरही 25 वर्षे नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. माझ्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना व्हावा हीच अपेक्षा आहे, ही नियुक्ती त्याचाच एक भाग आहे, असे अमोल यांनी सांगितले. भारत - दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका 2 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol muzumdar appointed south africa's batting coach