भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND

भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण; BCCI च्या बैठकीत चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या भारतीय क्रिकेट संघाला युएईत सुरू असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकात सुपर १२ फेरीमध्ये बाद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समजले जाणाऱ्या भारतीय संघाच्या सुमार कामगिरीचे विश्‍लेषण आता बीसीसीआयच्या चार डिसेंबरला कोलकाता येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीत २४ विविध विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.

भारतीय संघाला टी-२० विश्‍वकरंडकात अफगाणिस्तान, नामिबिया व स्कॉटलंड या तुलनेने दुय्यम संघाविरुद्ध विजय मिळवता आले. पण पाकिस्तान व न्यूझीलंड या दोन अव्वल दर्जाच्या संघांकडून विराट सेनेला पराभवाचा चेहरा पाहावा लागला. त्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला. भारताच्या या लाजिरवाण्या कामगिरीबाबत अध्यक्ष सौरव गांगुली, चिटणीस जय शहा यांच्यासह इतर सदस्य कोणता निर्णय घेताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा: T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

विराटच्या वन डे नेतृत्वावरही गदा?

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांचे जेतेपद पटकावता आलेले नाही. युएईमधील टी-२० विश्‍वकरंडकातही याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. याच कारणामुळे विराट कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडून देण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील नेतृत्व हे झटपट क्रिकेटमधील (टी-२०, वन डे) नेतृत्वापेक्षा चांगले आहे. त्यामुळे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्‍वकरंडकाआधी त्याच्याकडून नेतृत्व काढून घेण्याचा विचार बीसीसीआय करू शकतो. जेणेकरून भारतीय संघाला नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली संघबांधणी करता येऊ शकते. या मुद्द्यावरही आगामी बैठकीत चर्चा करण्यात येऊ शकते.

निवड समिती सदस्यांच्या कराराचे नूतनीकरण

बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समिती सदस्यांसोबत चार वर्षांचा करार केला आहे. दरवर्षी या कराराचे नूतनीकरण करण्यात येते. गेल्या दशकात मोहिंदर अमरनाथ, राजिंदर हंस व रॉजर बिन्नी या तीन व्यक्तींनाच राष्ट्रीय निवड समितीतील आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावरून मोहिंदर अमरनाथ यांचा एन श्रीनिवासन यांच्यासोबत वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांना कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पदावरून माघार घ्यावी लागली. राजिंदर हंस यांची कामगिरी अपेक्षेला साजेशी नसल्यामुळे त्यांनाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी हा देशासाठी खेळत असल्यामुळे त्यांनाही हितसंबंधाच्या मुद्द्यावरून माघार घ्यावी लागली. सध्याच्या निवड समिती सदस्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात येईल.

हेही वाचा: T20 WC: ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये?

गांगुली, शहा बीसीसीआयचे प्रतिनिधी

आयसीसीच्या बैठकांमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष सौरव गांगुली व चिटणीस जय शहा यांच्या नावांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाय दोन सदस्य पदांसाठी निवडणूक न घेता एकमताने निर्णय घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील विविध पदांसाठीच्या नियुक्त्या हाही विषय यावेळी चर्चिला जाईल.

loading image
go to top