
एकदिवसीय वरिष्ठ महिला गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत अनुजा पाटीलचे नाबाद शतक आणि कर्णधार अनघा देशपांडेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल संघावर चार गडी राखून विजय प्राप्त करीत चार गुण मिळविले.
पुणे - हिमाचल प्रदेश, उना येथे सुरू असलेल्या एलिट ‘अ’ व ‘ब’ गटाच्या एकदिवसीय वरिष्ठ महिला गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत अनुजा पाटीलचे नाबाद शतक आणि कर्णधार अनघा देशपांडेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल संघावर चार गडी राखून विजय प्राप्त करीत चार गुण मिळविले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
इंदिरा स्टेडिअमवर गुरुवारी झालेल्या या दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राची कर्णधार अनघा देशपांडेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हिमाचल संघाची सुरवात निराशाजनक ठरली. दोन बाद दोन वरून कर्णधार सुषमा वर्मा आणि नीना चौधरी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी केली या जोरावरच हिमाचल संघाला तीन बाद २०८ धावांपर्यंत मजल मारता आली त्यांच्या सुषमा वर्माने १६० चेंडूत पंधरा चौकारासह १०१ धावा केल्या तर नीना चौधरीने १३१ चेंडूत आठ चौकारासह नाबाद ९० धावा केल्या
प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचेही मुक्ता मगरे आणि शिवाली शिंदे ही सलामीचा जोडी लवकर बाद झाल्याने त्यांची दोन बाद १२ अशी स्थिती झाली होती. मात्र, अनघा देशपांडे आणि अनुजा पाटीलने सुरेख फलंदाजी करत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला. अनुजा पाटीलने १०५ चेंडूंत अकरा चौकारांसह नाबाद १०४ धावांची, तर अनघा देशपांडेने ९७ चेंडूंत सहा चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. अनघा देशपांडे आणि अनुजा पाटील या जोडीने तिसऱ्या विकेटकरिता १०८ धावांची भागीदारी केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सामन्यातून चार गुण मिळविले असून त्यांचा तिसरा सामना त्रिपुरा संघा बरोबर २२ तारखेला होणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
हिमाचल - ३ बाद २०८ (सुषमा वर्मा १०१, नीना चौधरी नाबाद ९०, प्रियांका गारखेडे १-१८, श्रद्धा पोखरकर १-२७) पराभूत विरुद्ध महाराष्ट्र - ६ बाद २०९ (अनूजा पाटील नाबाद १०४, अनघा देशपांडे ५५, तनुजा कन्वर ३-३२, अनिषा अन्सारी २-२२, एन. एम. चौहान १-३७).