केवळ 'अनुपम' तोफेने घेतले 14 बळी!

सतीश स. कुलकर्णी satish.kulkarni@esakal.com
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

प्रशिक्षक प्रा. श्रीकांत निंबाळकर शिष्याच्या कामगिरीने हरखून गेले. ते म्हणाले, ''अनुपम 11 वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत तर तो महाराष्ट्राकडून सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज आहे. यॉर्कर त्याचे ब्रह्मास्त्र! अफलातून टाकतो. अतिशय शिस्तबद्ध, मेहनत करणाऱ्या अनुपमला आता वरच्या पातळीवर खेळण्याची संधी मिळालीच पाहिजे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे चीज झालेच पाहिजे.'' 

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी (ता. 13) आणि मंगळवारी (ता. 15) तोफ धडाडली. त्यातून सुटलेले आगगोळे भेदक होते. त्यामुळे विदर्भाचा बालेकिल्ला बेचिराख झाला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळीत 'मस्ट विन' अशी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला निर्णायक विजय साधला. विदर्भाला उद्‌ध्वस्त करणाऱ्या त्या तोफेचा 'गोलंदाज' होता नगरचा अनुपम संकलेचा! 

या सामन्याच्या दोन्ही डावांत अनुपमने सात-सात बळी घेतले. मंगळवारी तर त्याने पाच फलंदाजांचा त्रिफळा उडवला! सामन्यात 94 धावांमध्ये 14 बळी. महाराष्ट्राकडून कोणत्याही गोलंदाजाची ही बहुदा सर्वोत्तम कामगिरी असावी. खुद्द अनुपमला त्याची कल्पना नाही. पण या सामन्यामुळे, त्यातील 'मॅचविनिंग परफॉर्मन्स'मुळे तो कमालीचा खूष आहे. ''आपल्याला या सामन्यात निर्णायक विजय मिळायलाच हवा होता. त्यासाठी विदर्भाचा डाव लवकरात लवकर गुंडाळणे आवश्‍यक होते. ते करता आले, याचा आनंद मोठा आहे,'' अशी भावना त्याने व्यक्त केली. 

अनुपम म्हणाला, ''सामना जिंकायाचाच, या हिशेबाने आम्ही खेळलो. पहिल्या दिवशी खेळपट्टी थोडी साथ देणारी होती. थोडं दवही होतं. त्याचा फायदा झाला आणि यश मिळालं.'' पहिल्या दिवशी 'हाय कोर्ट एंड'कडून त्याची एका स्पेलमधील कामगिरी 5-1-10-5 अशी होती. निर्णायक स्पेल होता तो. अनुपम म्हणाला, ''पहिल्या डावातील दोनपैकी तो स्पेल भन्नाटच होता. मीही खूष आहे त्यावर!'' 

सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाची अवस्था एक बाद 141 अशी बऱ्यापैकी होती. अनुपमच्या म्हणण्यानुसार खेळपट्टी 'इज आऊट' झाली होती. कारण त्याच खेळपट्टीवर खेळत महाराष्ट्राने चांगली धावसंख्या उभी केली होती. पण अशा परिस्थितीतही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या तिखट माऱ्यापुढे विदर्भाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. महाराष्ट्राचा डावाने विजय झाला. 

विदर्भाच्या दुसऱ्या डावात, निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या दिवसासाठी महाराष्ट्राच्या संघ व्यवस्थापनाने नेमके काय नियोजन केले होते? अनुपम म्हणाला, ''मी मघाशी सांगितल्याप्रमाणं खेळपट्टी व्यवस्थित होती. कर्णधार केदार जाधव आणि कोच यांनी मला सांगितलं, की 'तू तुझ्या पद्धतीने, आक्रमक गोलंदाजी करीत राहा. बिनधास्तपणे!' आमच्याकडे आघाडी भरपूर होती. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार मी आक्रमक गोलंदाजी केली. 'स्टम्प-टू-स्टम्प' असाच माऱ्याचा रोख ठेवला. त्यामुळे बळी मिळाले.'' 

''या सामन्यात अशी कामगिरी केल्यामुळे आनंद आहेच. माझा वेगही 130 किलोमीटरपेक्षा जास्तच राहिला. लय सापडली होती. 'स्टम्प-टू-स्टम्प' असाच मारा करण्याचं लक्ष्य ठेवल्यामुळं जे यश मिळालं, त्यामुळं फार छान वाटत आहे,'' असंही अनुपम म्हणाला. 

नगरच्या वाडिया पार्क मैदानावर अनुपमने क्रिकेटचे धडे गिरवले. प्रा. श्रीकांत निंबाळकर यांच्या 'श्री समर्थ नेट'चा तो बिनीचा शिलेदार. त्याच्या रूपाने नगरला दीर्घ काळानंतर महाराष्ट्राच्या संघात संधी मिळाली. मधली काही वर्षं वगळता अनुपम दशकभर महाराष्ट्राकडून रणजी स्पर्धा खेळतो आहे. अनुभवामुळे त्याचा माराही अधिक अचूक, भेदक होत आहे. त्याला याहून मोठी संधी मिळणार आणि तिथेही तो नगरचे नाणे खणखणीत वाजवणार, असेच नगरकरांना वाटते आहे. 

अनुपमची कामगिरी 
यंदाच्या रणजी हंगामातील पाच सामन्यांमध्ये अनुपमने 23 बळी मिळविले आहेत. महत्त्वाचे म्हणजे 158 षटके गोलंदाजी टाकताना त्याचे केवळ दोन 'नो-बॉल' पडले. त्याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीचेच हे चिन्ह. त्याची प्रत्येक सामन्यातील कामगिरी अशी : 
झारखंड : 32.2-12-71-5 व 10-4-29-2 
दिल्ली : 23-5-58-0 
सौराष्ट्र : 22-9-57-0 
राजस्थान : 31.4-9-69-2 व 3-3-0-0 

मोठी संधी मिळावी 
अनुपमने क्रिकेटचे धडे ज्यांच्याकडे गिरवले, ते प्रशिक्षक प्रा. श्रीकांत निंबाळकर शिष्याच्या कामगिरीने हरखून गेले. ते म्हणाले, ''अनुपम 11 वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत तर तो महाराष्ट्राकडून सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज आहे. यॉर्कर त्याचे ब्रह्मास्त्र! अफलातून टाकतो. अतिशय शिस्तबद्ध, मेहनत करणाऱ्या अनुपमला आता वरच्या पातळीवर खेळण्याची संधी मिळालीच पाहिजे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे चीज झालेच पाहिजे.'' 
 

Web Title: anupam sanklecha makes record at ranji trophy