तिरंदाजी संघटना अखेर बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकीबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येण्यास काही तास असतानाच जागतिक संघटनेने भारतीय संघटनेस बडतर्फ केले आहे. त्याचबरोबर या महिन्यात अंतिम निर्णय न झाल्यास भारतीयांच्या सहभागाबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सूचित केले आहे

मुंबई / नवी दिल्ली : तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकीबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येण्यास काही तास असतानाच जागतिक संघटनेने भारतीय संघटनेस बडतर्फ केले आहे. त्याचबरोबर या महिन्यात अंतिम निर्णय न झाल्यास भारतीयांच्या सहभागाबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सूचित केले आहे.

अर्जुन मुंडा आणि बी. व्ही. पी. राव यांच्यापैकी कोणाची संघटना वैध याबाबत अथवा नव्याने एकत्रित निवडणूक घेण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा उद्या (शुक्रवार, 9 ऑगस्ट) निर्णय अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वी एका पत्रकाद्वारे जागतिक संघटनेने भारतीय संघटनेची बडतर्फी जाहीर केली. मात्र त्याच वेळी या महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा स्पर्धेत भारतीय तिरंदाज सहभागी होऊ शकतील, असे सांगितले आहे. त्याच वेळी तोडगा न निघाल्यास भारतीय तिरंदाजांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा रोखण्यात येईल, असेही सांगितले आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटना; तसेच केंद्र सरकारच्या मदतीने भारतीय तिरंदाजी संघटनेवर तात्पुरती समिती नेमण्याची सूचनाही जागतिक संघटनेने केली आहे; मात्र ऑगस्टपर्यंत तोडगा न निघाल्यास भारतीय तिरंदाजांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागाबाबतचा निर्णय कार्यकारिणी घेईल. त्यात आशियाई स्पर्धेचाही सहभाग असेल. ऑलिंपिक पात्रतेसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

संघनिवडीचा घोळही कायम
आशियाई तिरंदाजी स्पर्धेसाठी चाचणी सोनीपतला सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची भारताच्या अनेक तिरंदाजांना पुरेशी कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. आता भारतीय पुरुष संघ ऑलिंपिक तिरंदाजीस पात्र ठरला आहे. सोनीपतची चाचणी ही ऑलिंपिक संघनिवडीचा भाग असेल, असे आता अचानक ठरले आहे. याची पुरेशी कल्पनाच देण्यात आली नाही. त्यामुळे देशातील अनेक अव्वल तिरंदाज नाराज असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: archery association future will be decided by delhi court decision