esakal | अर्जेंटिना प्रशिक्षक बुझांची हकालपट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जेंटिना प्रशिक्षक बुझांची हकालपट्टी

अर्जेंटिना प्रशिक्षक बुझांची हकालपट्टी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ब्यूनोस आयर्स - रशियात पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी अपात्रतेच्या उंबरठ्यावर असलेल्या अर्जेंटिनाने प्रशिक्षक एडगार्डो बुझा यांची हकालपट्टी केली. होर्गे साम्पाओली नवे प्रशिक्षक असण्याची शक्‍यता अर्जेंटिनाच्या प्रसिद्धिमाध्यमांनी व्यक्त केली आहे.

साम्पाओली यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली नसली, तरी ते नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 2015 मधील कोपा अमेरिकन स्पर्धेत ते चिलीचे प्रशिक्षक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिलीने कोपा लिबर्टाडोरेस विजेतेपद मिळवले होते.

आम्ही बुझा झांबरोबर असलेला करार संपुष्टात आणला आहे, असे अर्जेंटिना फुटबॉल संघटनेचे नवे अध्यक्ष क्‍लाऊडियो तापैया यांनी सांगितले. दक्षिण अमेरिका गटात अर्जेंटिना सध्या पाचव्या स्थानी आहे. स्पर्धेतील चार सामने शिल्लक असून, हुकमी खेळाडू लिओनेल मेस्सीवर चार सामन्यांची बंदी आहे. या गटातून पहिले चार संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत; तर पाचव्या क्रमांकाचा संघ ओशियाना गटातील संघाविरुद्ध "प्ले-ऑफ'मध्ये पात्रतेसाठी खेळेल.

यंदाच्या पात्रता स्पर्धेत बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने आठ सामन्यांपैकी तीन विजय, दोन बरोबरी आणि तीन पराभव अशी कामगिरी केली आहे. साम्पाओली सध्या सेव्हिला या क्‍लबचे प्रशिक्षक आहेत. अर्जेंटिनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडे 31 ऑगस्टपर्यंत वेळ असेल. अर्जेंटिनाचा पात्रता स्पर्धेतील पुढील सामना उरुग्वेविरुद्ध होणार आहे.

loading image
go to top