IPL 2020 : लायन विल रोअर अगेन!

IPL_CSK
IPL_CSK

IPL 2020 : आयपीएल सुरू झाल्यापासून धोनीवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. पण, टीका करणाऱ्यांकडं बघून मला अक्षरश: कीव येते. सोशल मीडियावर तर दहापैकी ५ पोस्ट या चेन्नईबद्दल आणि त्यातही धोनीबद्दल हमखास असणार. गल्लीत क्रिकेट खेळताना एक गडी कमी पडतोय म्हणून ज्याला टीममध्ये खेळवलं जातं ते बेनंही उठसूठ धोनीवर टीका करायला लागलंय. ज्यानं आयसीसीच्या नव्हे, तर क्रिकेट विश्वातील सर्व महत्त्वाच्या स्पर्धांचं जेतेपद पटकावलं आहे त्या धोनीवर नको त्या शब्दात टीका करताना पाहिलं की मनातून जळफळाट होतो. तुम्ही कोणत्या टीमचे, प्लेअरचे फॅन आहात यानं मला काही फरक पडत नाही, पण जेव्हा धोनीवर टीका केली जाते तेव्हा थोडं आश्चर्य वाटतं. वाटतं उठावं अन् याला कानाखाली वाजवून दिवसा तारे दाखवावे, पण नंतर वाटतं की जाऊ द्या, आपण ज्याला आयडॉल मानतो त्या धोनीनंच कधी असा प्रकार केला नाही, किंवा करायला सांगितला नाही. ऐन प्रेस कॉन्फरन्समध्ये समोरून टीका होत असतानाही तो शांत राहतो त्याप्रमाणे आपणही राहावं. (धोनीनं स्वत:च्या घरावर दगडं पडताना पाहिलेत, मग या टीका तर मामुली गोष्टी आहेत.) एकदा त्यानं म्हटलेलंही- Everybody has views in life and it should be respected. 

जेवढे धोनीचे चाहते आहेत तेवढेच त्याच्यावर टीका करणारेही आहेत. कारण क्रिकेटला धर्म मानणाऱ्या या देशात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, आताही आहेत आणि भविष्यात घडतीलही. पण जे यश (अपयश ही म्हणतो) धोनीच्या वाट्याला आलं, ते इतर दुसऱ्या कुठल्या खेळाडूच्या वाट्याला आलं आहे हे भिंग लावलं तरी शोधूनही सापडत नाही. कारण आयसीसीच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा, २००७ चा टी-२० वर्ल्ड कप, २०११ चा वनडे वर्ल्ड कप, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटीमध्ये नंबर वन रँकिंग, आयपीएलमध्ये तीनवेळा जेतेपद, दोनवेळा चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये त्याच्या टीमनं पटकावली. त्यानंतर विकेटकीपर म्हणूनही त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले आहेत. आणखी बरंच काही. एवढं सगळं मिळूनही धोनीनं कधी आविर्भाव दाखवला नाही. हे सारं आपल्या आवडत्या खेळाडूच्या वाट्याला आलं नाही, त्यामुळेच बरेचजण धोनीचा तिरस्कार करतात, हे माझं वैयक्तिक मत आहे आणि निरीक्षणही. 

राहिला प्रश्न फिटनेसचा, धोनी सध्या ३९ वर्षांचा आहे. त्यामुळे त्यानं आता रिटायर्ड व्हावं असं बऱ्याच जणांना वाटत आहे. प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी थांबावंच लागतं. तसं धोनीलाही एका ठराविक वेळी थांबावं लागणार आहे. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली या दिग्गज खेळाडूंनी जसा थांबण्याचा निर्णय घेतला तसा धोनीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. पण आयपीएल ही व्यावसायिक लीग असल्यामुळे या फॉरमॅटमध्ये कधी थांबायचं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आता टीकाकार म्हणतील की, '...म्हणजे धोनी आता पैशासाठी खेळतोय.' मग मला असं म्हणायचंय की, तुमच्या आवडत्या खेळाडूनं आयपीएल खेळून काय समाजसेवा केलीय ते सांगा आणि मग धोनीवर बिंधास्त टीका करा. 

बर ते जाऊ द्या, महत्त्वाचा विषय बाजूलाच राहिला. परवा सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचवेळी धोनी थकल्याचं दिसून आलं. त्याचं शरीर आता त्याला साथ देत नसल्याचं दिसत आहे. २२ यार्ड सर्कलमध्ये खेळताना धोनी धापा टाकत असल्याचं पाहिलं अन मन खचलंच की हो. याआधी धोनीला थकल्याचं कधी पाहिलं नव्हतं. मध्यंतरी त्याला पाठदुखीचा त्रास होत असतानाही तो मैदानात बेल्ट लावून खेळत होता. हैदराबादच्या मॅचवेळीही त्याने रनर घेतला नाही अगदी दम भरून येत असूनही. वनडे, टी-२० किंवा कसोटीमध्ये विकेटकीपिंग करत असताना प्रत्येक बॉलला त्याला उठाबशा काढाव्या लागत होत्या, तरीही तो रन्स काढताना हरणाच्या चपळाईनं पळायचा. पण कालचं चित्र चाहत्यांनाच नव्हे, तर चक्क धोनीलाही विचार करायला लावणारं होतं. 

यूएईमध्ये साधारण ३५ ते ४० डिग्रीच्या दरम्यान तापमान राहतं. तेथील हवामान, हवेतली आर्द्रता, कोरोनामुळे सरावामध्ये पडलेला ५-६ महिन्यांचा खंड याचा खेळाडूंच्या फिटनेसवर नक्कीच परिणाम होत आहे. २० ओव्हर फिल्डींग केल्यानंतर १० मिनिटाचा ब्रेक घेऊन परत मैदानात उतरायचं आणि रन्सचा पाठलाग करायचा. असं करताना धोनीच काय पण २० वर्षाचा पड्डीकलही कालच्या सामन्यात थकलेला दिसला. गेल्या ४-५ वर्षांपासून फिटनेसबाबत कमालीचा आग्रही असलेला कॅप्टन विराट कोहली याच कारणामुळे खेळाडूंना फिटनेसकडे लक्ष्य देण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे पड्डीकलसारख्या तरूण खेळाडूंनी फिटनेसबाबत आताच खबरदारी घ्यायला हवी. धोनी आता रिटायरमेंटकडे आला असला तरी एक खेळाडू म्हणून त्याच्याही फिटनेसचा प्रश्न उभा राहतोच की. शेवटच्या ओव्हरमध्ये २०-२५ रन्सची बरसात करणाऱ्या धोनीला आता १५ रन्स काढणंही जड जाऊ लागलं आहे, हेही तितकंच खरं आहे. जगातील बेस्ट फिनिशर आता थकलाय याचेच हे संकेत आहेत, पण त्याच्यातली कमबॅक करण्याची शक्ती संपलीय असं म्हणता येणार नाही. कारण तो चॅम्पियन आहे. आणि चॅम्पियन कमबॅक करतात हे क्रिकेटनं अनेकवेळा पाहिलं आहे. What defines a champion is not winning, but rising after defeat.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जने पॉईंट टेबलचा तळ गाठला होता. २०१४ नंतर चेन्नईने पहिल्यांदाच सलग ३ मॅच गमावल्या आहेत. यंदा त्यांचा स्टार खेळाडू 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैना टीममध्ये नाहीय आणि याचा फटका नक्कीच चेन्नईच्या टीमला बसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मुरली विजय आणि शेन वॉटसन यांच्याकडून पहिल्या काही ओव्हरमध्ये मोठी खेळी होताना दिसत नाहीय. अंबाती रायडूने एका मॅचमध्ये छाप पाडली, पण दुसऱ्या मॅचमध्ये तोही काही कमाल करू शकला नाही. फाफ डू प्लेसिस एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय. मधल्या फळीतील केदार जाधवलाही सूर गवसला नाही. सॅम करनही मिळेल तसा धावा कुटत आहे. कॅप्टन धोनीच्या फिटनेसने आयपीएलच्या सुरवातीलाच डोके वर काढले आहे. तळाच्या फळीतील रवींद्र जडेजाकडून फटकेबाजीची अपेक्षा आहे.

सलग तीन मॅच गमावल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नई एक्सप्रेसनं जबरदस्त कमबॅक केलं. आणि आपली गाडी रुळावर आणली. कॅप्टन धोनीने मुरली विजयला या मॅचमध्ये विश्रांती दिली. शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस या ओपनर जोडीनं सुरवातीपासूनच मॅचवर ताबा ठेवला होता. कोणतीही घाई न करता आणि चुकीचा फटका न मारता त्यांनी चेन्नईचा स्कोअर बोर्ड हलता ठेवला. या जोडीनं विकेट न सोडता पंजाबनं दिलेलं १७९ रन्सचं टार्गेट गाठलं आणि चेन्नईला १० विकेट्सनी मोठा विजय मिळवून दिला. पण अशा एका विजयाने जास्त काही फरक पडणार नाही. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चेन्नईला अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे.    

'डॅडी टीम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईपुढे अनेक आव्हानं आहेत. टीममध्ये तरुण खेळाडूंची संख्या कमी आहे. त्याचा परिणाम फिल्डिंगवर होताना दिसतोय. टीमच्या विजयासाठी एक रन वाचवणं किती महत्त्वाचं आहे, हे धोनीला चांगल माहित आहे, पण यूएईमधलं हवामान, त्याचा खेळाडूंच्या फिटनेसवर होणारा परिणाम यापुढे एक माणूस काही करू शकणार नाही. आणि मॅचच्या हार-जीतमध्ये दोष कुणा एकालाच देता येणार नाही. 

धोनी कितीही थकला तरी त्याचे फॅन्स त्याला मैदानात पाहण्यासाठी आजही तितकेच आतूर आहेत. चेन्नईनं आयपीएल जिंकली काय आणि नाही काय धोनी स्टम्पच्या मागे ग्लोव्ह्ज घालून फक्त उभा जरी दिसला, तरी देव पावला. Lion will rore again. 

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com