सात्विक - अश्विनीची चमकदार सलामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय बॅडमिंटन रसिकांना सुखद धक्का देताना थायलंड ओपन बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या सलामीच्या फेरीत ऑलिंपिक उपविजेत्या जोडीस पराजित केले.

मुंबई : सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय बॅडमिंटन रसिकांना सुखद धक्का देताना थायलंड ओपन बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या सलामीच्या फेरीत ऑलिंपिक उपविजेत्या जोडीस पराजित केले. त्यांच्या कामगिरीमुळे साईनाची पुनरागमनाच्या स्पर्धेतील विजयी सलामी; तसेच किदांबी श्रीकांतची कडव्या संघर्षानंतरची सरशीही काहीशी झाकोळली गेली.

जागतिक बॅडमिंटनच्या दुहेरीत चीन, जपान, मलेशियाची मक्तेदारी आहे. चॅन पेंग सून आणि गॉह लिऊ यिंग यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. या
मलेशियाच्या जोडीस भारतीयांनी 62 मिनिटांच्या लढतीत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत हरवले. सात्विक - अश्विनीने ही लढत 21-18, 18-21, 21-17 अशी सहज जिंकली.

जागतिक क्रमवारीत 23 व्या असलेल्या अश्विनी - सात्विकचा मलेशियन जोडीविरुद्धचा हा केवळ दुसरा विजय. त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सांघिक लढतीत बाजी मारली होती; पण वैयक्तिक स्पर्धेत ते उपांत्य फेरीत पराजित झाले होते. या वेळी निर्णायक गेममध्ये भारतीय जोडी 5-11 अशी मागे होती. बाजू बदलल्यावर भारतीयांनी सलग आठ गुण जिंकत आघाडी मिळवली आणि ती राखत संस्मरणीय विजय मिळवला.

श्रीकांत बचावला
पाचव्या मानांकित श्रीकांतने मोक्‍याच्या वेळी सावरत पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. त्याने इंडोनेशियाच्या ऐफ्रियन एका प्रासेत्या याला 21-13, 17-21, 21-19 असे हरवले. त्याने पहिला गेम 12-12 बरोबरीनंतर सहज जिंकला, त्या वेळी एकतर्फी लढत अपेक्षित होती; पण त्यानंतर श्रीकांतने प्रतिस्पर्धीस संधी दिली. निर्णायक गेममध्ये तर तो 11-15 असा मागे पडला. पण त्यानंतर तो सावरला. 17-17, 18-18, 19-19 बरोबरीनंतर श्रीकांतने दोन गुण जिंकत सामनाही जिंकला.

पहिला गेम गमावल्यावर पारुपली कश्‍यपने मिशा झिल्बरमन याला हरवले. कश्‍यपने ही लढत 18-21, 21-8, 21-14 अशी जिंकली. एच. एस. प्रणॉयने हॉंगकॉंगच्या वॉंग विंग याला 21-16, 22-20 नमवले; मात्र आठवा मानांकित समीर वर्मा पराजित झाला. त्याचा ली झि जिआविरुद्धच्या लढतीचा 23-21, 11-21, 5-21 गुणफलकच सर्व काही सांगतो. केंतो मोमोतो याने शुभंकर डे याला पुढे चाल दिली.

साईनाच्या ताकदवान रॅलीज
दोन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या साईना नेहवालने थायलंडच्याच फित्तायापोर्न चाईवान हिचा 21-17, 21-19 असा पाडाव केला. चाईवानच्या फसव्या रॅलीजने साईनास काहीसे सतावले खरे. दोन महिन्यांनंतर स्पर्धात्मक लढत खेळत असल्याचा परिणामही साईनाच्या खेळात जाणवत होता, पण साईनाने मोक्‍याच्या वेळी ताकदवान रॅलीज करीत हुकुमत राखली. या सामन्यातील काही रॅलीज दीर्घही झाल्या, पण साईनाच्या चेहऱ्यावरील हास्य अखेरच्या टप्प्यातही कायम होते, हे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच सुखावणारे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashwini - satwin stunned olympic silver medalist