esakal | जपानचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

hockey

जपानचा धुव्वा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मस्कत (ओमान) - आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील भारताची विजयी मालिका तिसऱ्या सामन्यातही कायम राहिली. राउंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानचा ९-० असा धुव्वा उडविला. 

पाकिस्तानविरुद्ध सुरवातीच्याच मिनिटाला भारताला गोल स्वीकारावा लागला. जपानविरुद्ध मात्र चौथ्या मिनिटापासून सुरू केलेला गोल सिलसिला भारतीयांनी ५७व्या मिनिटांपर्यंत कायम राखला होता. भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत साखळी सामन्यात जपानवर ८-० असा विजय मिळविला होता. मात्र, पुढे जाऊन जपानने स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले, तर भारताला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. 

भारताच्या सर्वोत्तम प्रदर्शनापुढे जपानचा संघ आज साफ निष्प्रभ ठरला होता. मिळालेल्या संधीवर गोल करण्याचे कौशल्यही ते दाखवू शकले नाहीत. त्याउलट भारताने निर्विवाद वर्चस्व राखताना केलेल्या प्रत्येक खोलवर चालीवर गोल केला. भारताचे आक्रमण इतके धारदार होते, की जपानची बचावफळी त्यांना अडथळा आणण्याची क्षमताही दाखवू शकली नाही.

भारताने सामन्यातील प्रत्येक सत्रात गोल केला. पहिल्या दोन सत्रात प्रत्येकी दोन गोल करून त्यांनी विश्रांतीला ४-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रात त्यांनी तीन गोल केले. अखेरच्या चौथ्या सत्रातच ते गोलपासून वंचित राहणार असे वाटत असताना अखेरच्या नऊ मिनिटांत त्यांनी आणखी दोन गोल केले. 

मैदानी गोलपेक्षा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले यश भारतीयांना नक्कीच सुखावणारे असेल. पाकिस्तानविरुद्धच्या विजयातही भारतीय संघ व्यवस्थापन आक्रमणाच्या आघाडीवर फारसे समाधानी नव्हते. 

जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी या आघाडीवरही मार्ग शोधल्याचे दाखवून दिले. भारतीयांनी मिळालेल्या पाच कॉर्नरपैकी तीनवर गोल केले. भारताचा बचावही भक्कम होता. जपानला पहिला कॉर्नर मिळविण्यासाठी चौथ्या सत्राची वाट पाहावी लागली यातूनच भारताच्या बचावफळीची  कामगिरी उठून दिसते. भारताची गाठ आता उद्या गतविजेत्या मलेशियाशी पडणार आहे.

नऊ गोलचा धडाका
ललित उपाध्याय (४, ४५वे मिनीट), हरमनप्रीत सिंग (१७, २१वे मिनीट), मनदीप सिंग (४९ आणि ५७वे मिनीट), गुरजंत सिंग (८वे मिनीट), कोथाजित सिंग (४२वे मिनीट) आणि आकाशदीप सिंग (३५वे मिनीट) यांनी भारतासाठी गोल केले.

loading image
go to top