पाकने गतविजेत्या भारताला रोखले; १-१ अशी बरोबरी | hockey Asia Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022 hockey Pakistan hold India

पाकने गतविजेत्या भारताला रोखले; १-१ अशी बरोबरी

hockey Asia Cup 2022 : युवा खेळाडूंसह मैदानात उतरणाऱ्या गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला सोमवारपासून सुरू झालेल्या आशियाई हॉकी करंडकाच्या अ गटातील सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. आठव्या मिनिटाला सेलवम कार्तीने गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी ५७ मिनिटे कायम ठेवण्यात भारताला यश लाभले, पण राणा अब्दुलने ५८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत पाकिस्तानला पराभवापासून वाचवले. यावेळी भारत विजयापासून दूर गेला.

या स्पर्धेसाठी भारतीय संघात ज्युनियर विश्व करंडकातील दहा हॉकीपटू आहेत. आगामी महत्त्वाच्या स्पर्धा (राष्ट्रकुल, विश्‍वकरंडक) बघता भारताच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आठव्या मिनिटातच भारताने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत गोलाचे खाते उघडले. तमिळनाडूच्या युवा खेळाडूने भारताच्या वरिष्ठ संघातून खेळताना पहिलाच गोल केला. त्याने पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या या दोन्ही क्वॉर्टर्समध्ये दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. त्यामुळे भारताची आघाडी कायम राहिली. चौथ्या क्वॉर्टरमध्ये ५७ व्या मिनिटांपर्यंत भारताचा विजय निश्‍चित होता; पण ५८ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला व भारतापासून विजय दूर गेला. भारतीयांनी रेफरलची मागणी केली. पण रिबाऊंडवर झालेला हा गोल ग्राह्य धरण्यात आला. भारताने रेफरल गमावला. अखेर दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी झाली.

जपानकडून इंडोनेशियाचा धुव्वा

‘अ’ गटातील अन्य लढतीत जपानच्या हॉकी संघाने इंडोनेशियावर ९-० अशा फरकाने दणदणीत विजय साकारला. या लढतीत यामासाकी कोझीने १४ व्या, २० व्या, २१ व्या व ३४ व्या मिनिटाला गोल करीत जपानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने केलेले चारपैकी ३ गोल हे फिल्ड गोल होते हे विशेष. यामासाकीने एक गोल पेनल्टी कॉर्नरवर केला.

मलेशिया, कोरिया विजयी

‘ब’ गटातील लढतींमध्ये मलेशिया व दक्षिण कोरिया या दोन देशांनी विजय संपादन केले. मलेशियाने ओमानचा ७-० अशा फरकाने धुव्वा उडवला. रहीम राझीने मलेशियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने गोलची हॅट्ट्रिक साकारली. रहीमने ५ व्या, १२ व्या व १८ व्या मिनिटाला गोल केले. तीनपैकी दोन गोल हे पेनल्टी कॉर्नरवर केले गेले. एक गोल पेनल्टी स्ट्रोकच्या साह्याने केला. अन्य लढतीत दक्षिण कोरियाने बांगलादेशला ६-१ अशा फरकाने नमवले.

Web Title: Asia Cup 2022 Hockey Pakistan Hold India To Dramatic 1 1 Draw Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top