जय शहांची ‘एकमताने’ पुन्हा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Shah re-elected as President of the Asian Cricket Council

जय शहांची ‘एकमताने’ पुन्हा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने शनिवारी (ता. १९) आशिया चषक २०२२ ची तारीख जाहीर केली. आगामी आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळली जाईल. सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहे. २०१६ नंतर प्रथमच ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह उपस्थित होते. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह २०२४ पर्यंत आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष राहतील, असा निर्णय एसीसी सदस्यांनी घेतला. (Jai Shah re-elected as President of the Asian Cricket Council)

२०१८ मध्ये शेवटी आशिया चषक (Asia Cup 2022) आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ही स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची होती. भारताने ५० षटकांची स्पर्धा जिंकली होती. सातवेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा आठव्यांदा विजेतेपदासह विजयाच्या हॅट्ट्रिककडे राहील. कारण, भारताने २०१६ आणि २०१८ मध्ये सलग दोनवेळा विजेतेपद पटकावले आहेत.

आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. परंतु, २०२० ची स्पर्धा आशियाई क्रिकेट (Cricket) परिषदेने (ACC) कोरोनामुळे रद्द केली होती. समितीने यंदा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेचे क्वालिफायर सामने २० ऑगस्ट २०२२ पासून सुरू होतील. मात्र, एसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

हेही वाचा: पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दोन तरुणांचा बुडून मृत्यू

शनिवारी (ता. १९) श्रीलंकेची (Sri Lanka) राजधानी कोलंबो येथे आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. बैठकीत परिषदेचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत प्रामुख्याने आशिया कप २०२२ च्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी आणि ACC चे सदस्य मंडळ सहभागी झाले होते. आशिया चषक 2022 च्या यजमानपदाची जबाबदारी श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट बोर्डाकडे सोपवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची दुसरी वेळ

आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asia Cup 2022) बैठकीत २७ ऑगस्टपासून आशिया चषक २०२२ सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख ११ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ही स्पर्धा २० षटकांच्या स्वरूपात आयोजित केली होती.

जय शाह २०२४ पर्यंत अध्यक्ष

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. श्रीलंकेत शनिवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या एजीएम बैठकीत जय शाह हे २०२४ पर्यंत ACCचे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली. जय शाह यांनी २०२१ मध्ये जानेवारीच्या अखेरीस आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून निवड झालेले ते सर्वांत तरुण प्रशासक आहेत.

Web Title: Asia Cup 2022 Sri Lanka India Cricket Sourav Ganguly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..