
Asia Cup 2022 : शकिब हसन संतापला; सुपर-4 चुका सुधारण्यावर विचारमंथन सुरू
Asia Cup 2022 : आशिया करंडक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ सुपर-4 मध्ये दाखल झाले आहेत, साखळी लढतीत केलेल्या चुका टाळण्याबरोबर दुबईतील उष्ण हवामानात कसे तग धरायचे याचे विचारमंथन आता चारही संघ करू लागले आहेत.
दुबईची हवा अजूनही भयानक गरम आहे, याचा खेळाडूंना खेळताना त्रास होतो आहे. घशाला सतत कोरड पडणे, दडपणाखाली खेळताना स्नायू आखडणे असा त्रास होतो आहे. तरीही सगळ्यांना भरपूर पाणी पिऊन शरीराची काळजी घ्यावी लागत आहे. खेळातील तंत्राबरोबर दोन चुका टाळण्यासाठी चारही संघ गांभीर्याने विचार करत आहेत.
साखळी स्पर्धेत बऱ्याच सामन्यांत षटके वेळेत टाकण्याकरिता संघ धडपड होते. भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ दोन षटके वेळेत मागे पडल्याने पाचऐवजी चार खेळाडू सीमारेषेवर ठेवणे नियमानुसार भाग पडले आणि त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागला होता.
‘‘भारतीय संघाच्या बैठकीत हा मुद्दा गांभीर्याने चर्चिला जातो आहे. कसेही करून षटकांची गती राखणे अनिवार्य आहे याची आम्हाला जाणीव आहे. मोक्याच्या सामन्यात गरजेच्या वेळी चारच खेळाडू सीमेवर उभे करण्याचा दंड अंगावर आला तर तो महागात पडतो हे दिसून आले आहे. म्हणून ओव्हर रेट कायम ठेवणे गरजेचे आहे,’’ असे भुवनेश्वर कुमार म्हणाला आहे.
दुसरा मुद्दा गोलंदाजी करताना अतिरिक्त धाव आणि त्याने टाकाव्या लागणाऱ्या अतिरिक्त चेंडूचा आहे. टी-20 सामन्यात चेंडू कणभरही डाव्या यष्टीबाहेर गेला किंवा आखूड टप्प्याचा चेंडू डोक्याच्या वर गेला तर पंच त्या चेंडूला वाईड ठरवतात. कमरेवरच्या फुलटॉस चेंडूला नो बॉल जाहीर करतात. गोलंदाज त्या बदल्यात अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि धावाही जोडल्या जातात.
शकिब हसन संतापला
‘‘वेगवान गोलंदाजाने नो बॉल टाकणे ही चूक असते, पण फिरकी गोलंदाजाने नो बॉल टाकणे मला गुन्हा वाटतो. फिरकी गोलंदाज जेमतेम 4-5 पावलांत गोलंदाजी करतो, मग पाय पुढे जातोच कसा मला समजत नाही.
नो बॉल टाकले गेले तर सामन्याचा तोल बिघडतो. या चुका टाळल्या गेल्याच पाहिजेत, नाहीतर त्याची मोठी किंमत मोजावी लागते, अशी निराशा बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केली.
षटके वेळेत संपवण्याचे गणित जुळवणे आणि वाईड सोबत नो बॉल न टाकणे हेच दोन मुद्दे सुपर फोर संघाचे कप्तान आणि प्रशिक्षकाला खेळाडूंच्या मनात ठसवत आहेत. 50 दिवसांवर मुख्य टी-20 वर्ल्डकप येऊन ठेपला असताना क्रिकेटच्या तंत्राच्या सरावाबरोबर असे काही मुद्दे संघाच्या बैठकीत प्राधान्याचे ठरत आहेत हे विशेष.