
Asia Cup : लंका ग्रुप स्टेज मधील पराभवाचा बदला सुपर-4 मध्ये घेणार का?
Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीला झालेला अफगाणिस्तान-श्रीलंका हा सामना सुपर- ४ मध्येही सलामीला होत आहे. त्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात श्रीलंका संघ बॅकफूटवरच असेल.
अफगाणिस्तानला टी-२० या प्रकारात कोणीही कमी लेखत नाही. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करून त्यांनी आपली ताकद याआधीच दाखवलेली आहे.
श्रीलंकेने काल झालेल्या सामन्यात बांगलादेशवर निसटता विजय मिळवत सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. बांगलादेशने केलेल्या चुकांचा फायदा त्यांना मिळाला होता. तशा चुका अफगाणिस्तान करणार नाही. त्यामुळे त्यांन सावधच राहावे लागेल.
दुबईची खेळपट्टी वेगवेगळे रंग दाखवत असली, तरी अफगाणिस्तानकडे असलेले मुजीब उर रहमान आणि रशिद खान कोणत्याही परिस्थितीत धोकादायक ठरू शकतात. नव्या चेंडूवर फारूकीने कमाल दाखवलेली आहे. श्रीलंकेकडे वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्न असे फिरकी गोलंदाज आहेत. बांगलादेशविरुद्ध त्यांनी दोन-दोन विकेट मिळवल्या होत्या; तरीही बांगला फलंदाजांनी १८३ अशी धावसंख्या उभारली होती. बांगलादेशला षटकांची गती न राखल्याचा फटका बसला होता.