Asian Archery C’ships: तिरंदाजीत ज्योतीचा दुहेरी लक्ष्यभेद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asian Archery C’ships: तिरंदाजीत ज्योतीचा दुहेरी लक्ष्यभेद

Asian Archery C’ships: तिरंदाजीत ज्योतीचा दुहेरी लक्ष्यभेद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढाका : भारताची २५ वर्षीय महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील गुरुवारचा दिवस गाजवला. तिने महिलांच्या वैयक्तिक गटातील कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावला. तसेच ज्योती सुरेखा वेन्नम हिने रिषभ यादवसोबत मिश्र गटात रौप्यपदकही जिंकले. अभिषेक वर्मा याने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले. भारताच्या तिरंदाजांनी गुरुवारी तीन प्रकारांत पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली.

ज्योती सुरेखा वेन्नम या भारताच्या महिला खेळाडूने उपांत्य फेरीच्या लढतीत कोरियाची माजी विश्‍वविजेती किम युन्हीला १४८-१४३ अशा फरकाने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर भारताच्या या तिरंदाजाने अंतिम फेरीतही कोरियन खेळाडूला पराभूत करीत आशियाई विजेती होण्याचा मान संपादन केला. अंतिम फेरीच्या लढतीत कोरियन प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफकडून एका गुणासाठी गोंधळ घालण्यात आला. कोरियन तिरंदाजाच्या बाणाने नऊ गुणांचा वेध घेतला होता. जजकडूनही तोच निकाल देण्यात आला, पण कोरियन प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफकडून सातत्याने १० गुणांची मागणी करण्यात येत होती. जागतिक तिरंदाजीच्या नियमानुसार जजचा निकाल हा अंतिम असतो. त्यामुळे ज्योती सुरेखा वेन्नम हिने अंतिम फेरीची लढत १४६-१४५ अशा एका गुणाच्या फरकाने जिंकली. ज्योती सुरेखा वेन्नम हिने या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक पक्के केले.

सुवर्ण अन्‌ ब्राँझ हुकले

पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात भारताला गुरुवारी दोन पदके मिळाली असती, पण एकाच पदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक वर्मा याला अंतिम फेरीच्या लढतीत कोरियन तिरंदाजांकडून हार सहन करावी लागली. त्यामुळे त्याला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. तसेच मोहित देशवाल याला ब्राँझपदकाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताला पदक मिळवण्याच्या आशांवर पाणी सोडावे लागले.

जागतिक स्पर्धा व आशियाई गेम्सवर लक्ष

ज्योती सुरेखा वेन्नम हिला आगामी लक्ष्याबाबत विचारले असता ती म्हणाली, या वर्षीचा मोसम आता या स्पर्धेने संपलाय. पुढल्या वर्षी महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक स्पर्धा तसेच आशियाई गेम्स या दोन स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा मानस आहे. ऑलिम्पिकमध्ये मी खेळत असलेल्या खेळाचा प्रकार नसतो. त्यामुळे मला त्यामध्ये सहभागी होता येत नाही, असे पुढे तिने नमूद केले.

"वयाच्या ११ व्या वर्षापासून तिरंदाजी हा खेळ खेळत असून वयाच्या १५ व्या वर्षापासून देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. याआधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला छान कामगिरी करता आली. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठीच उतरले. माझ्या बाणाने अचूक वेध साधावा यासाठी मेहनत घेतली. याचमुळे कोरियन तिरंदाजांनाही पराभूत करता आले. या विजयाचे श्रेय माझ्या संपूर्ण टीमला जाते."

-ज्योती सुरेखा वेन्नमपुणे

loading image
go to top