
सौरभ धनावडे
मुंबईची मुलगी सोनाली शिंगटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला कबड्डी संघाने नुकतेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यजमान इराणच्या संघाला त्यांच्याच घरी पराभूत करून पाचवे आशियाई अजिंक्यपद नावावर केले. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सोनालीच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण ठरला. सामान्य कुटुंबात वाढलेल्या सोनालीचे इतरांप्रमाणेच शिक्षण पूर्ण करून नोकरीला जाऊन घरच्यांचा आर्थिक भार हलका करण्याचे स्वप्न होते. तिला पोलीस बनायचे होते आणि त्यासाठी तिने प्रयत्नही केले, याच प्रयत्नात तिची कबड्डीसोबत नाळ जोडली गेली. तिने मिळवलेले यश हे तिच्या संघर्षाला मानाचा मुजरा देणारे ठरले आहे. सोनालीचा मुंबई ते इराण हा प्रवास इतरांसाठी खराच प्रेरणादायी आहे.
भारताच्या या गोल्डन गर्लसोबत सकाळ डिजीटल टीमने संपर्क साधला व सोनाली शिंगटेचा संघर्षमय प्रवास जाणून घेतला. हा विजय सोनालीसाठी खूप खास होता, कारण २०२३ च्या आशियाई स्पर्धेतील संघात निवड झालेली असताना देखील सोनाली ती स्पर्धा खेळू नव्हती. स्पर्धेला अवघे १० दिवस शिल्लक असाताना तिला मोठी दुखापत झाली. त्यानंतर ती पुन्हा खेळेल की नाही याची देखील खात्री नव्हती, पण त्यानंतर तिची सर्जरी झाली व तीने दुखापतीतून सावरून थेट संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले.